डोंगर पोखरून बांधला बंगला, सजावटीसाठी चक्क सोन्याचा वापर; माजी मुख्यमंत्र्यांचा ‘शीशमहाल’ रडारवर

डोंगर पोखरून बांधला बंगला, सजावटीसाठी चक्क सोन्याचा वापर; माजी मुख्यमंत्र्यांचा ‘शीशमहाल’ रडारवर

Andhra Pradesh News : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या शीशमहालाची चांगलीच चर्चा झाली होती. आता अशाच एका शीशमहालाची चर्चा दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात सुरू (Andhra Pradesh News) झाली आहे. हा अत्यंत टुमदार बंगला तब्बल 10 एकर परिसरात बांधण्यात आला आहे. सजावट चक्क सोन्यानं करण्यात आली आहे. चकचकीत इटालियन संगमरवरी दगडात बंगला कोरला गेला आहे. याच बंगल्यातून राज्याचा कारभार हाकला जायचा. पण आता असं नेमकं काय घडलं की हा बंगला चर्चेत आलाय? बंगला नेमका आहे तरी कुणाचा? बंगला तयार करण्यासाठी खरंच नियम धाब्यावर बसवले गेले का? याचीच माहिती जाणून घेऊ या..

विशाखापट्टणमच्या सुदूर भागात 10 एकरातील या सर्व सुविधांनी युक्त बंगल्याला रशिकोंडा पॅलेस (Rashikonda Palace) म्हणून आंध्र प्रदेशात ओळखले जाते. हा राजवाडा म्हणा किंवा शीशमहल म्हणा राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Moha Reddy) यांचा आहे. जगन रेड्डी सत्तेत असताना हाच बंगला त्यांचे कार्यालय आणि राहण्याचे ठिकाण होता. या बंगल्याच्या आसपास मूलभूत सुविधांचे जाळेच तयार करण्यात आले आहे. गुळगुळीत रस्ते, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था आणि 100 केव्ही वीज सबस्टेशन येथे आहे. यासाठी जवळपास 500 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी हा आकडा 600 कोटी सांगितला जात आहे.

कोणत्याच देशाचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं काय होतं? जाणून घ्या, नियम अन् कायदे..

अर्धा डोंगरच पोखरला

या बंगल्याच्या आतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगला तयार करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात आले असा आरोप होत आहे. बंगला बांधण्यासाठी अतिशय सुंदर अशा राशिकोंडा पहाडाचा जवळपास अर्धा हिस्सा खोदण्यात आला होता. यामुळे पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अधिकृत रेकॉर्डनुसार केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 19 मे 2021 रोजी पर्यटन विकास परियोजने अंतर्गत यास मंजुरी दिली होती. परंतु जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने कायद्याचा विचार न करता या बंगल्याचे बांधकाम केले असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

बंगला नायडू सरकारच्या रडारवर

या अतिशय भव्य बंगल्याचे बांधकाम जगन रेड्डी मुख्यमंत्री असताना झाले होते. पण आता राज्यात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. नायडू यांचा टीडीपी पक्ष केंद्रातही सत्तेत आहे. सार्वजनिक संपत्तीचा दुरुपयोग जगन सरकारच्या काळात झाला असा आरोप नायडू प्रशासन करत आहे. शीशमहल बांधकाम आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 600 कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्याची शक्यता आहे. परंतु जगन रेड्डी सरकारमधील तत्कालीन मंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी सर्व आरोप फेटाळून लावत बंगल्याचे बांधकाम कायदेशीर मार्गानेच झाल्याचा दावा केला आहे.

बापरे! प्रदूषणात भारताचे रेकॉर्ड, तब्बल 13 शहरे प्रदुषित; ‘या’ शहराचा पहिला नंबर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube