Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन

Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर (Ayodhya Ram Mandir) दर्शनासाठी रामभक्तांचा महापूर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे अयोध्येत सध्या जनसागर उसळला आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. भाविकांनी येथील परिस्थिती पाहता काही दिवस थांबून नंतर दर्शनाला यावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील रामभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. रामलल्लांच्या दर्शनासाठी अगदी कडाक्याच्या थंडीतही भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दर्शनाबरोबरच रामाच्या चरणी भरभरून दान देखील दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन दिवसांत राम मंदिराच्या तिजोरीत तब्बल 3.17 कोटी रुपये जमा झाले आहेत. भाविकांनी दानपेटीत ऑनलाइन पद्धतीने सुद्धा देणगी दिली आहे.

राम मंदिराला 101 किलो सोनं दान करणारे दिलीप लाखी कोण? मुंबईशी आहे कनेक्शन

अयोध्येत देशभरातून रामभक्तांची गर्दी झाली असून ही गर्दी रोखण्यासाठीच उत्तर प्रदेश सरकारकडून मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांनी बॅरिअर्स लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही या रस्त्यांवरुन प्रवास करण्यास अडचण येत आहे. नुकताच अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा पार पडला असून या सोहळ्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी देशभरातून असंख्या नागरिक अयोध्येत दाखल झाले आहेत. दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं समजताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्येत धाव घेत हेलिकॉप्टरने परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर सीआरपीएफच्या पथकाकडे अयोध्येतील गर्दी कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 10 दान काउंटर उघडण्यात आले होते. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर भक्तांनी दान काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या माध्यमातून 3.17 कोटी रुपये देणगी दिली आहे. 23 जानेवारीला पाच लाखांहून जास्त भाविकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तर बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत अडीच लाख भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बुधवारी मिळालेल्या देणगीचा खुलासा आज होण्याची शक्यता आहे.

श्रीराम मंदिरामुळे व्यापाऱ्यांचीही चांदी : बाजारपेठेत एक लाख कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज

दरम्यान, राममंदिर सोहळ्यासाठी देश-विदेशातून भरपूर देणग्या देण्यात आल्या आहेत. अनेकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली. सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. राम मंदिरासाठी एकूण 5500 कोटी रुपयांच्या आसपास देणग्या जमा झाल्या आहेत. राम मंदिरातील गाभारा दरवाजासह एकूण 15 दरवाजे सोन्याचे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube