केरळचा ‘अमिताभ’, भाजपसाठी किंगमेकर? डाव्या पक्षांना धक्क्यासाठी रचलाय ‘त्रिशूर’चा व्यूह

केरळचा ‘अमिताभ’, भाजपसाठी किंगमेकर? डाव्या पक्षांना धक्क्यासाठी रचलाय ‘त्रिशूर’चा व्यूह

Lok Sabha Polls 2024 : उत्तर प्रदेशच्या राजकारणात कधीकाळी हेमवती नंदन बहुगुणा यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यांचा पराभव करणं अशक्य कोटीतील गोष्ट असायची. पण आपले मित्र राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमिताभ बच्चन यांनी 1984 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. अमिताभ यांनी इलाहाबाद (आताचे प्रयागराज) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी बहुगुणा यांचा 1.87 लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.

हाच इतिहास केरळ राज्यात पुनरावृत्ती करेल अपेक्षा भाजप नेत्यांना वाटत आहे. भाजपसाठी हे काम मल्याळम सिनेमाचे अमिताभ बच्चन म्हणजेच सुरेश गोपी करतील असे भाजप नेत्यांना वाटत आहे. भाजपने त्यांना त्रिशूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सुरेश गोपी मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार आहेत. त्यांच्या मदतीने डाव्या पक्षांचा हा बालेकिल्ला उद्धवस्त करू असा विश्वास भाजपला वाटत आहे.

केरळमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी भाजपला सर्वधिक विश्वास सुरेश गोपी यांच्यावरच आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे केरळमध्ये मल्याळम सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे. येथील 90 टक्के लोक हीच भाषा बोलतात. मनोरंजनाच्या बाबतीतही मल्याळम सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण भारतातील लोकांन चित्रपटातील अभिनेत्यांचं प्रचंड वेड आहे. याच कारणामुळे अभिनेते त्यांना देवासारखे वाटू लागतात. त्यामुळेच सुरेश गोपी राज्यात भाजपचे ताकदवान नेते ठरू शकतात असा विश्वास भाजपला आहे.

Lok Sabha Election साठी ओवेसींविरुद्ध कोट्यवधींची मालकीन मैदानात; माधवी लता हैदराबादचा गड भेदणार?

सुरेश गोपी फक्त अभिनेतेच नाहीत तर त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकांची मोठी सेवा केली आहे. त्यामुळे एक चांगला माणूस अशी त्यांची प्रतिमा केरळच्या जनमानसात तयार झाली आहे. लोकांना उपचारांसाठी मदत तसेच गरीब मुलांच्या शिक्षणात मदत करणे ही कामे त्यांची संस्था करते. लोकसभा निवडणुकीत त्यांची ही प्रतिमा मोठी ताकद ठरू शकते.

सुरेश गोपी यांच्या विरोधात काँग्रेसने के. मुरलीधरन यांना तर सीपीआय पक्षाने व्हीएस सुनीलकुमार यांना उमेदवारी दिली आहे. तसं पाहिलं तर या मतदारसंघात काँग्रेस आणि डाव्या पक्षात थेट लढत होत असते. परंतु आता सुरेश गोपी त्यांच्यावर भारी पडू शकतात असे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे भाजपने तिरुवनंतपुरम मतदारसंघात केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांना तिकीट दिले आहे. चंद्रशेखर काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांना टक्कर देत आहेत. पण या मतदारसंघावर थरुर यांची मजबूत पकड आहे. या मतदारसंघात ते सलग चौथ्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे थरुर यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.

मोदींच्या आरोपाचा Fact Check : खरंच इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी राजीव यांनी ‘वारसा कर’ रद्द केला?

राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप या निवडणुकीत फक्त विजयच नाही तर नवीन राजकारणाच्या संधींच्या शोधात आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जादुई करिष्मा या जोरावर भाजप केरळमध्ये प्रवेश करण्यात यश मिळवेल असा विश्वास पक्ष नेत्यांना वाटत आहे. भाजप एका जागेवर जरी जिंकला तरी दक्षिण भारतातील राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते.

दरम्यान, केरळमधील सर्व 20 मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान झाले. आता येथील सगळ्या उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला याचं उत्तर थेट 4 जूनलाच मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube