ममता बॅनर्जींमागील ससेमिरा कायम, अमित शाहंवरील गंभीर आरोपप्रकरणी गुन्हा दाखल
case registered against Mamata Banerjee यांच्या विरोधात गाजलेल्या हत्याकांडात अमित शाह यांचे नाव जोडल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
case registered against Mamata Banerjee for serious allegations on Amit Shah : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोलकात्यातील एका आंदोलनादरम्यान बांगलादेशातील गाजलेल्या हत्याकांडाचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्रालय आणि अमित शाह यांचे नाव जोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Indian Railway Food : रेल्वेच्या जेवणातून माशा-झुरळं होणार हद्दपार; IRCTC चा हायटेक प्लान…
हा वाद २ जून २०२६ रोजी कोलकात्यातील धर्मतळा येथे टीएमसीच्या धरणे आंदोलनादरम्यान सुरू झाला. आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, बांगलादेशातील एका मोठ्या हत्येमागील संपूर्ण कटकारस्थान आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे त्यांना माहिती आहेत. मात्र, ही माहिती उघड केल्यास शेजारील देशात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्या त्याचा खुलासा करणार नाहीत. त्यांचा स्पष्ट संदर्भ बांगलादेशी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येकडे होता.
ममता बॅनर्जी नेमके काय म्हणाल्या?
एफआयआरनुसार, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बांगलादेशातील एका मोठ्या गुन्हेगाराला एसटीएफने अटक केली होती. त्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. “मी इतर देशांच्या अंतर्गत बाबींवर बोलत नाही. मात्र माझा मुद्दा एवढाच आहे की, संबंधित व्यक्ती मेघालयमार्गे बंगालमध्ये आली होती. येथे आल्यानंतर आमच्या एसटीएफने त्यांना अटक केली. याबाबत केंद्रीय गृहमंत्री स्वतः बोलले आहेत. मी आतापर्यंत शांत होते, पण आता अत्याचाराची परिसीमा गाठली गेल्याने मला बोलावे लागत आहे,” असे त्यांनी म्हटले.
वकील रिंकी चॅटर्जी सिंह यांनी दाखल केली तक्रार
ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर सिलिगुडी येथील वकील रिंकी चॅटर्जी सिंह यांनी त्यांच्या विरोधात सिलिगुडी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्या मते, ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात देशाच्या गृहमंत्रालयाचे नाव घेत संवेदनशील आणि गोपनीय बाबी सार्वजनिक केल्या आहेत. वकिलांचा आरोप आहे की, अशा प्रकारची राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती जाहीरपणे मांडल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
बांगलादेशात खळबळ
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर बांगलादेशातही राजकीय आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा उबैद यांनी अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दुसऱ्या देशात निवडणुकीचे वातावरण असताना तेथील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, उस्मान हादी हत्याकांडातील संशयितांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेश सरकार भारत सरकारशी थेट राजनैतिक माध्यमांतून संपर्कात आहे.