चिकन खाताय? मग सावध व्हा! केंद्र सरकारचा 9 राज्यांना अलर्ट; पत्रात नेमकं काय?

Bird Flu : देशभरात चिकन आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे चिकनला मोठी मागणी आहे. परंतु, आता याच चिकनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यपालन आणि डेअरी मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) बाबतीत पंजाबसह देशातील 9 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी या राज्यांना एक पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की एवियन इन्फ्लूएंझा वायरसने भारतात रस्ता तयार केला आह. या व्हायरसने संक्रमित असलेले चिकन खाणारे लोकही संक्रमित होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
जानेवारी 2025 पासून 9 राज्यांत एवियन इन्फ्लूएंझा व्हायरसची प्रकरणे आढळून येत आहेत. यामध्ये सरकारी मालकीच्या पोल्ट्रींचाही समावेश आहे. त्यामुळे व्हायरसचा फैलाव रोखण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सर्व सरकारी, वाणिज्यिक आणि बॅकयार्ड पोल्ट्री फार्म्सना जैव सुरक्षा उपाययोजनांना अधिक बळकट करण्याची गरज आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात बर्ड फ्लूचा वेगाने होतोय शिरकाव; पशुसंवर्धन विभाग उपचारांसाठी अॅक्शन मोडमध्ये
सर्व सरकारी कुक्कुटपालन केंद्रांत लवकरात लवकर बायोसिक्युरिटी ऑडीट करून घ्यावे. यात जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्या तत्काळ दुरुस्त करुन घ्याव्यात. बायोसिक्युरिटी प्रोटोकॉलचे पालन होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. असामान्य मृत्यू दराची माहिती वेळेवर नोंद व्हावी यासाठी पोल्ट्री कर्मचाऱ्यांसाठी जागरुकता कार्यक्रम सुरू करावेत.
या व्हायरसचा बंदोबस्त करण्यासाठी नॅशनल अॅक्शन प्लॅनची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. क्लिक रिस्पॉन्स टीम कार्यान्वित कराव्यात आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात यावी. या उपाययोजनांवर तत्काळ लक्ष द्यावे जेणेकरून या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल, अशा सूचना मंत्रालयाने या पत्रात दिल्या आहेत.
बर्ड फ्लूची लक्षणे काय
बर्ड फ्लूच्या लक्षणांचा विचार केला तर ही लक्षणे सामान्य इन्फ्लूएंझाशी मिळतीजुळती असतात. डोळे लाल होणे, ताप, खोकला, थकवा येणे, स्नायू दुखू लागणे,अस्वस्थ वाटणे, उलट्या जुलाब होणे, नाक बंद होणे किंवा वाहू लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे बर्ड फ्लूच्या रुग्णांत दिसतात.
बर्ड फ्लूचा धोका वाढला! मुंबई, ठाणे अलर्ट; लातुरात 4200 पिल्लांच्या मृत्यूने खळबळ
बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंझा मुख्यत्वे पक्ष्यांना प्रभावित करतो. परंतु, काही परिस्थितीत मनुष्यांनाही संक्रमित करू शकतो. संक्रमित पक्षी किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कात आल्याने हा विषाणू फैलावतो. संक्रमित पक्ष्यांना सांभाळणारे व्यक्ती, पोल्ट्री फार्मशी संबंधित कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लू होण्याची दाट शक्यता असते. चिकन योग्य प्रकारे शिजवले गेले नाही तर या मार्फत हा व्हायरस माणसांना देखील संक्रमित करू शकतो.