Download App

फक्त दिल्लीच नाही तर ‘या’ चार राज्यांतही काँग्रेसची पाटी कोरीच; एकही आमदार नाही

फक्त दिल्लीच नाही तर आंध्र प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही.

Congress Party : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Election Results) अखेर आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. 48 जागा जिंकून बहुमत मिळवले. तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने दिल्ली जिंकली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा सुपडा साफ करण्याचे उद्दिष्ट मात्र भाजपला साध्य करता आले नाही. जवळपास 43 टक्के मते घेत आपने 22 जागा जिंकल्या. या उलट काँग्रेसला दिल्लीच्या (Congress Party) जनतेने साफ नाकारले. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तसे पाहिले तर फक्त दिल्लीच नाही तर आणखीही काही राज्ये आहेत जिथे काँग्रेसची पाटी कोरी आहे.

देशातील चार राज्ये अशी आहेत जिथे काँग्रेसचा एकही आमदार नाही. यामध्ये आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या एकूण 175 जागा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या (Chandrababu Naidu) तेलुगू देसम पक्षाने जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे बहुतांश उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर काहींचे डीपॉझिट जप्त झाले.

आंध्र प्रदेशात सध्या एनडीए आघाडीचे 164 आमदार आहेत. विरोधी वायएसआर काँग्रेसचे फक्त 11 आमदार आहेत. विशेष म्हणजे 2014 पर्यंत राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेसचा एकही आमदार नाही.

दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? महिला आमदारालाही संधी मिळू शकते, कारण…

पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस झिरो

पश्चिम बंगाल विधानसभेत (West Bengal) एकूण 294 मतदारसंघ आहेत. सन 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत पुन्हा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसने डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली होती. परंतु याचा काहीच फायदा झाला नाही. राज्यात काँग्रेस पहिल्यांदाच शून्यावर पोहोचला. राज्यात आज तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. या सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे 224 आमदार आहेत. तर भाजपचे 66 आमदार आहेत.

सन 2022 मध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरदिघी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. परंतु नंतर आमदारांनी तृणमूल मध्ये प्रवेश केला. यानंतर राज्यात जितक्या पोटनिवडणुका झाल्या त्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

सिक्कीममध्येही काँग्रेसला भोपळा

सिक्कीममध्ये विधानसभेच्या 32 जागा आहेत. एकेकाळी सिक्कीममध्ये (Sikkim News) काँग्रेसचे शासन होते. परंतु आज सिक्कीम काँग्रेसमुक्त झाला आहे. विधानसभेतील सर्व 32 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे वर्चस्व आहे.

नागालँडमध्येही काँग्रेस शून्यावर

नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. सध्या एनडीपीपीकडे 25, भाजपला 12, एनसीपीला 7, एनपीपीला 5, एलजेपीला 2 आणि आरपीआयला दोन जागा मिळाल्या आहेत. या व्यतिरिक्त एनपीएफला 2 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे या राज्यात सर्वच पक्ष सरकारमध्ये सहभागी आहेत. येथे विरोधी पक्षच नाही.

‘पक्ष संघटनेत बदल करणे आवश्यक’; दिल्लीत पराभवानंतर तारिक अन्वरांकडून कॉंग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह…

पूर्वोत्तर राज्यांत एक एक जागा

अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. एनडीएकडे यातील 59 जागा आहेत तर काँग्रेसचा फक्त एक आमदार आहे. मेघालय (Meghalaya News) आणि मिझोराममध्येही काँग्रेसचे एक एक आमदार आहे. मणिपूर (Manipur News) आणि पुदुच्चेरी मध्ये काँग्रेसचे दोन दोन आमदार आहेत. सध्या देशभरात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. फक्त पंजाब, कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश या चारच राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. अन्य राज्यांत एकतर काँग्रेस कमकुवत आहे किंवा प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसची वाटचाल सुरू आहे.

follow us