मोठी बातमी : केजरीवालांचा मुक्काम तुरूंगातच राहणार; दिल्ली HC ची जामीनावर स्थगिती कायम
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन अर्जावर काल (दि.24) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न देता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत वाट बघण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज (दि.25) दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने दिलेल्या जामीनावर स्थगिती कायम ठेवली आहे.या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुख्य खंडपीठात सविस्तर सुनावणीची गरज असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे तूर्तास कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामीनाच्या आदेशावरील स्थगिती कायम राहणार असल्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालायने दिले (Delhi High court) आहेत. त्यामुळे आता 26 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
#BREAKING Delhi High Court stays Arvind Kejriwal's bail, says trial court did not properly appreciate the materials. https://t.co/veLmURtM62
— Live Law (@LiveLawIndia) June 25, 2024
दिल्लीतील कथित दारू धोरण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनाच्या निर्णयाला स्थगिती दिली देत अंतिम निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. त्यावर काल सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना कोणताही दिलासा न देता दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघा असे सांगितले.
2 जून रोजी केजरीवालांकडून आत्मसमर्पण
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात केजरीवालांनी आंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांसाठी वाढवण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांचे अपील फेटाळले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केले होते.
केजरीवालांना 21 मार्च रोजी अटक
ईडीने 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. याआधी त्यांना 9 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र या समन्सनंतरही केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर झाले नव्हते. त्यानंतर 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. 22 मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी ईडीने 11 दिवसांच्या कोठडीत रिमांड घेतला होता. चौकशीनंतर 1 एप्रिल रोजी केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.