फडणवीसांनी ‘मराठा’ समाजासाठी काय केले? जरांगेंच्या आरोपांनंतर भाजपने समोर आणली ‘कामांची’ यादी
देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नजरेत सहा महिन्यांपासून हे एकच नाव डोक्यात फीट बसलं आहे. फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष आहे. त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील करत आहेत. रविवारी तर या वादाने टोकच गाठले. फडणवीस यांचा मला संपवण्याचा डाव आहे. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्लॅन आहे, असे एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत जरांगे पाटील आक्रमक झाले होते. ते थेट फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी रवाना झाले.थोडक्यात जरांगे पाटील यांच्या नजरेत देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजासाठीचे व्हिलन आहेत.
पण फडणवीस यांनीच मराठा समाजाला कसा न्याय दिला, फडणवीस हेच मराठा समाजाचे कसे हिरो आहेत, असे सांगणारी एक जाहिरात भाजपने प्रकाशित केली आहे. या जाहिरातीच राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतीच जाहिरात देण्यात आली आहे. यात 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात आधी मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या कामांचा सविस्तर तपशीलच देण्यात आला आहे. मराठवाड्यात पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात महत्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाहुयात नेमके देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय काय केले?
फडणवीसांनी ‘मराठा’ समाजासाठी काय केले? जरांगेंच्या आरोपांनंतर भाजपने समोर आणली ‘कामांची’ यादी
फडणवीस यांनी सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न दोनवेळा मार्गी लावला. याबाबतचा दावा स्वतः फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. पहिल्यांदा 2018-19 मध्ये फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ केले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवून दाखवले आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांचे सरकार असेपर्यंत धक्का लागला नव्हता. मात्र ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय 14 वेगवेगळ्या योजना आणि निर्णयांचा उल्लेख करत या जाहिरातीमध्ये फडणवीस यांनी केलेल्या कामाची यादी देण्यात आली आहे.
काय म्हटले आहे जाहिरातीमध्ये?
एकूण अधिसंख्य पदे भरली : सुमारे 4500
- मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या 42 आंदोलनकर्त्यांपैकी पात्र 35 वारसांना एसटीत नोकरी.
- या 35 कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख प्रदान
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना :
- एकूण लाभार्थी : 77,381
- 6112.90 कोटींचे कर्ज
- 637.86 कोटी रुपये व्याज परतावा
गट कर्ज व्याज परतावा योजना :
- एकूण लाभार्थी 649
- व्याज परतावा 13.12 कोटी
ज्या भावना गवळींविरोधात भाजपने रान उठवले, आता त्यांच्यासाठीच PM मोदी मागणार मतं…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना :
- एकूण लाभार्थी 649
- व्याज परतावा 13.12 कोटी
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा :
- 11 हजार 393 कोटी विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये
कौशल्य प्रशिक्षण :
- सारथीतर्फे 35 हजार 726 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तिगृह योजना :
- 3 लाख 79 हजार 373३ विद्यार्थ्यांना 1 हजार 213 कोटी रुपये वितरित
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम :
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त विकास 27 हजार 346 विद्यार्थ्याचे प्रशिक्षण सुरु
सारथी राष्ट्रीय छात्रवृत्ती योजना :
- युपीएससीमध्ये 51 उमेदवार यशस्वी
- 12 आयएएस, 15 आयपीएस, ८ आयआरएस 1 आयएफएस 12 इतर सेवा
- एमपीएससीत 304 उमेदवार यशस्वी
- एकूण 2109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये
सारथी विभागीय कार्यालयांसाठी (छत्रपती शिवाजी महाराज संकुल) एकूण आठ विभागांत शासनाकडून विनामूल्य जमिनी :
- सारथी पुणे कार्यालय – 42.70 कोटी/ डिसेंबर 2023 अखेरीस काम पूर्ण
- सारथी खारघर – 119.28 कोटी रुपये
- सारथी उपकेंद्र – कोल्हापूर 146.38 कोटी रुपये
- सारथी नाशिक – 158.99 कोटी रुपये
- छत्रपती संभाजीनगर – 140.24 कोटी रुपये
- लातूर – 172.86 कोटी रुपये
- नागपूर – 204.64 कोटी रुपये
- एकूण 1015.10 कोटी रुपये
- (या प्रत्येक ठिकाणी 300 अभ्यासक, 500 मुले आणि 500 चे वस्तीगृह असणार)
PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात
श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो-जर्मन टूटरूम प्रशिक्षण :
- 146 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण, 644 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु
9 ते 11 साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना :
- गेल्यावर्षी 32, 539 विद्यार्थ्यांना 31.23 कोटी रुपये
- यावर्षी 44 हजरा 102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये
महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना
- 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाची मान्यता दरवर्षी 75 विद्यार्थी
- 12 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- एमएससी 60 लाख तर पीएचडीसाठी 1.60 कोटी
छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंधाच्या 50 हजार प्रती प्रकाशित :
- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, माध्यमिक शाळांमध्ये वितरित
थोडक्यात जे जरांगे पाटील फडणवीस यांना मराठा समाजाच्या नरजेत व्हिलन बनवत आहेत, त्यांच्याच बालेकिल्यात म्हणजे जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमधील वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देऊन भाजपने मराठा समाजाला पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तुम्हाला काय वाटते जरांगे म्हणतात तसे खरंच देवेंद्र फडणवीस व्हिलन आहेत का? की भाजप म्हणते तसे तेच मराठा समाजाचे खरे हिरो आहेत? याबाबतचे तुमचे मत आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.