पावसाचं गणित बिघडवून टाकणाऱ्या अल निनोचं संकट; भारतावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
El Nino Threat Intensifies अल निनोमुळे भारतासह महाराष्ट्रातील पाऊस, हिवाळा आणि उन्हाळ्यावर परिणाम होण्याची शक्यता.
El Nino Threat Intensifies: जागतिक हवामान संघटनेने जगाला एका मोठ्या धोक्याचा इशारा दिला आहे. प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) गर्भातील तापमानात अचानक 8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. या बदलामुळे अल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. या अल निनोचा भारतासह आपल्या महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जागतिक हवामान संघटनेने नेमका कोणता इशारा दिला?
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO – World Meteorological Organization) सरचिटणीस सेलेस्टे साऊलो (Celeste Saulo) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील अल निनोची स्थिती झपाट्याने तीव्र होत आहे. येत्या काही महिन्यांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, त्याचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम राहू शकतो.
पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?
अल निनोचा प्रभाव वाढल्यास त्याचा परिणाम केवळ पावसाळ्यावरच होणार नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्याच्या हवामानावरही होऊ शकतो. त्यामुळे पुढील काळात जगाला हवामानातील मोठ्या बदलांचा सामना करावा लागू शकतो. याचा भारत आणि विशेषतः महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, हे समजून घेणं गरजेचं आहे.
अल निनो आहे तरी काय?
अल निनो तयार होण्यामागे प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सामान्य परिस्थितीत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे समुद्राच्या पृष्ठभागावरील ‘गरम पाणी’ इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. परिणामी, दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या खोल भागातील थंड पाणी वर येत राहतं.
मात्र, हे वारे काही काळासाठी कमजोर झाले की परिस्थिती बदलते. पश्चिमेकडे साचलेलं गरम पाणी पुन्हा पूर्वेकडे सरकू लागतं. त्यामुळे मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. त्यामुळे समुद्राचं तापमान वाढतं. समुद्राच्या या तापमानवाढीचा परिणाम वातावरणातील वारे, ढगांची निर्मिती आणि पावसाच्या पद्धतीवर होतो.
समुद्राच्या पाण्याच्या तापमानातील या असामान्य वाढीमुळे वातावरणीय परिस्थितीत होणाऱ्या बदलांच्या संपूर्ण प्रक्रियेलाच ‘अल निनो’ म्हटलं जातं.
अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; “फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर”
जागतिक हवामान संघटनेचे अंदाज सेवा प्रमुख विल्फ्रांड मुफा ओकीया (Dr. Wilfran Moufouma-Okia) यांच्या मते, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरी 2.2 ते 2.6 अंश सेल्सिअसने वाढत असतं. मात्र, सध्या हे तापमान 3.6 अंश सेल्सिअसने वाढलं आहे. याशिवाय महासागराच्या खोल भागातील तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे.
भाषणात धनंजय महाडिकांची ‘स्लीप ऑफ टंग’; पक्षाचा अन् मुलाच्या पदाचा पडला विसर!
आतापर्यंत इतकी मोठी तापमानवाढ नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या तीव्र अल निनोला ‘गॉडझिला अल निनो’ असं म्हटलं जात आहे. या मोठ्या अल निनोमागे ग्लोबल वॉर्मिंग हे देखील एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
अल निनोचा भारतावर काय परिणाम होणार?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा ऑगस्ट महिना 1901 नंतरचा सर्वात उष्ण ऑगस्ट ठरला आहे. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पावसाची 16 टक्के तूटही नोंदवली गेली आहे.
याचा अर्थ चालू पावसाळा अपेक्षेइतका समाधानकारक राहिलेला नाही. पावसाची ही तूट पुढे रब्बी हंगामासाठी अडचणीची ठरू शकते. कारण रब्बी म्हणजेच हिवाळी पिकांसाठी पावसाळ्याच्या शेवटी जमिनीत असलेला ओलावा महत्त्वाचा असतो.
अल निनोचा प्रभाव वाढला तर त्याचा परिणाम केवळ भारताच्या पावसावरच होणार नाही, तर अन्नधान्याच्या साखळीवरही होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याचं उत्पादन घटल्यास त्याचा परिणाम पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यातून अन्नटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, अन्नटंचाईमुळे कुपोषणाचा धोका वाढू शकतो. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास साथीच्या आजारांचाही धोका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
दिल्लीच्या क्लायमेट ट्रेंड्स या संस्थेच्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील हिवाळ्याचा कालावधी कमी होत आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तापमान वेगाने वाढत असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे.
ही परिस्थिती रब्बी पिकांसाठी चिंतेची बाब आहे. गहू, हरभरा यांसारखी पिकं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतात. याच काळात तापमानात अचानक वाढ झाली, तर त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो.
जास्त तापमानामुळे पिकांना नुकसान होतं आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. परिणामी शेतकऱ्यांचं उत्पादन घटतं. उत्पादन कमी झालं की बाजारातील अन्नधान्याचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्यातून महागाई वाढण्याची शक्यता असते.
अल निनोच्या संकटात आशेचा किरण कोणता?
या अल निनोच्या पार्श्वभूमीवर एक आशेचा किरणही दिसत आहे. तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल (IOD). याला थोडक्यात हिंद महासागरातील अल निनो असंही म्हटलं जातं.
इंडियन ओशन डायपोलमध्ये हिंद महासागराच्या दोन भागांतील समुद्राच्या तापमानात फरक निर्माण होतो. जेव्हा आफ्रिकेजवळच्या समुद्राचं पाणी गरम होतं आणि इंडोनेशियाजवळच्या समुद्राचं पाणी तुलनेने थंड होतं, तेव्हा दोघांच्या मध्ये असलेल्या भारताला याचा फायदा होतो. दोन्ही बाजूचे थंड आणि गरम पाणी एकत्र आल्याने बाष्पयुक्त ढगांची निर्मिती होते, त्याला पॉझिटिव्ह IOD म्हणतात.
या तापमानातील फरकामुळे भारताच्या दिशेने पाऊस आणणाऱ्या बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीला मदत होऊ शकते. त्यामुळे अल निनोचा प्रतिकूल प्रभाव काही प्रमाणात कमी करण्यास पॉझिटिव्ह IOD मदत करू शकतो.
जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान 0.9 अंश सेल्सिअसचा पॉझिटिव्ह IOD तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात भारतात पावसाला काही प्रमाणात मदत मिळू शकते.
दहिहंडीच्या जल्लोषाला गालबोट; मालाडमध्ये 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
मात्र, याचा फार मोठा फायदा होईलच असं नाही. कारण आतापर्यंत झालेल्या कमी पावसामुळे जमिनीत कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे या काळात पडणारा पाऊस प्रामुख्याने जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
मग भारतात अन्नधान्याचा तुटवडा होईल का?
अल निनोचा प्रभाव वाढला तरी भारतात लगेच अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती नाही. कारण देशाकडे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे.
जे.एम. फायनान्शियलच्या अहवालानुसार, भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमध्ये 27.5 दशलक्ष टन आवश्यकतेच्या तुलनेत 53.4 दशलक्ष टन गव्हाचा साठा उपलब्ध आहे. तर 13.5 दशलक्ष टन आवश्यकतेच्या तुलनेत 68.2 दशलक्ष टन तांदळाचा साठा उपलब्ध आहे.
म्हणजेच, देशाकडे गरजेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात धान्यसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अल निनोमुळे अन्नसाठ्यावर काही परिणाम झाला, तरी बाजारातील धान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा साठा उपयोगी ठरू शकतो.
थोडक्यात…
अल निनोचा प्रभाव वाढला तर त्याचा परिणाम एकाच ऋतूपुरता मर्यादित राहणार नाही. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी
पावसात तूट, त्यानंतर कमी कालावधीचा हिवाळा आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये वाढणारं तापमान यामुळे विशेषतः रब्बी पिकांसमोर आव्हान निर्माण होऊ शकतं. त्याचा परिणाम पुढे अन्नधान्याच्या उत्पादनावर आणि महागाईवरही होऊ शकतो.
मात्र, पॉझिटिव्ह IOD आणि देशाकडे असलेला मोठा अन्नधान्यसाठा हे काहीसे दिलासादायक घटक आहेत.