नावात इतकं काय.. झारखंडच्या उमेदवारांना विचारा; सारख्याच नावाच्या अपक्षांनी फोडलाय घाम

नावात इतकं काय.. झारखंडच्या उमेदवारांना विचारा; सारख्याच नावाच्या अपक्षांनी फोडलाय घाम

Jharkhand Elections 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीत एकसारख्या (Jharkhand Elections 2024) नावांनी नेते मंडळींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. यामुळे मतदार संभ्रमात पडू शकतात अशी धास्ती नेत्यांना वाटू लागली आहे. त्यांच्या जागी या नाम साधर्म्य असणाऱ्या अपक्षांना मतदान होऊ शकते. झारखंडमध्ये असे किमान दहा विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे नेत्यांच्या नावाशी समानता असणारे अपक्ष मैदानात उतरले आहेत. सारखीच आडनावे असणारे अनेक अपक्ष सुद्धा रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

संथाल भागातील महेशपूर मतदारसंघ झारखंड मुक्ती मोर्चाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. झामूमोने येथे आमदार स्टेफन मरांडी यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघात स्टेफन मरांडी नावाच्या एका अपक्षानेही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे झामुमो उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोन सारख्याच नावांमुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. याच मतदारसंघात एलियास हेंब्रम आणि इलियास किस्कू हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Jharkhand New CM : हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार नवीन मुख्यमंत्री

सत्येंद्र नाथ तिवारी विरुद्ध सत्येंद्र तिवारी

संथाल भागातील आणखी एक मतदारसंघ शिकारीपुरा. या मतदारसंघात जोसेफ बास्की आणि जोसेफ बेसरा निवडणूक लढवत आहेत. दोघेही अपक्ष आहेत. अशाच पद्धतीने गढवा मतदारसंघात भाजपने यंदा माजी आमदार सत्येंद्र नाथ तिवारी यांना तिकीट दिलं आहे. याच मतदारसंघात सत्येंद्र तिवारी नावाचे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.

दक्षिण छोटा नागपूर भागातील लोहरदगा मतदारसंघात काँग्रेसने रामेश्वर उरांव यांना तिकीट दिलं आहे. तर रमेश उरांव नावाचे एक उमेदवार अपक्ष निवडणुक लढवत आहेत. येथे आडनाव सारखेच असल्याने काँग्रेस उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. तसेच रामेश्वर लोहरा नावाचे आणखी एक उमेदवार आहेत. नावात साधर्म्य असल्याने येथील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

खिजरी मतदारसंघात काँग्रेसने राजेश कच्छप यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. याच मतदारसंघात राज कच्छप नावाचे एक अपक्ष उमेदवार आहेत. जमशेदपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात माजी मंत्री सरयु राय आणि बन्ना गुप्ता आमनेसामने आहेत. याच मतदारसंघात सरयु दुसाध सुद्धा अपक्ष आहेत. सरयु राय यांना जेडीयूने तिकीट दिले आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता.

Jharkhand News : अबब! 15 हजार सॅलरी असणाऱ्या नोकराकडे कोट्यवधींचं घबाड; पाहा व्हिडिओ

पोटकात सरदारांची गर्दी

पोटका विधानसभा मतदारसंघात सरदार आडनाव असणारे अनेक उमेदवार रिंगणात आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने संजीव सरदार यांना तिकीट दिले आहे. तर सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाच्या तिकिटावर बिजन सरदार निवडणूक लढवत आहेत. भारत आदिवासी पार्टीच्या तिकिटावर महीन सरदार रिंगणात आहेत. सुबोध सिंह सरदार आणि लव कुमार सरदार हे दोन सरदार आपले नशीब आजमावत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube