Lok Sabha Election : बंगाल, बिहार, झारखंड अन् महाराष्ट्र, राजकीय वादाचा फायदा कुणाला ?

Lok Sabha Election : बंगाल, बिहार, झारखंड अन् महाराष्ट्र, राजकीय वादाचा फायदा कुणाला ?

Lok Sabha Election : दोन दिवसांआधी उत्तर भारताच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी (Lok Sabha Election) घडल्या. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. दुसरी घडामोड होती झारखंडमधील. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून सीता सोरेन यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. कुटुंबातील राजकारणावर नाराजी हेच कारण त्यामागे असल्याचे सांगितले गेले.

पण थांबा, परिवारातील हा वाद या दोन कुटुंबांपुरताच मर्यादित नाही तर असाच वाद महाराष्ट्रातील ठाकरे आणि पश्चिम बंगालमधील बॅनर्जी कुटुंबात झालाय. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष रोजच पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी बॅनर्जी परिवारातही धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या आल्या. आता प्रश्न असा निर्माण होत आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी कुटुंबात सुरू झालेल्या या वादाचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? वरवर दिसत असलेला हा वाद एखाद्या रणनीतीचा तर भाग नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पशुपती पारस यांचा गेम उलटू शकतो

बिहारच्या राजकारणात चिराग पासवान आणि पशुपति पारस या काका पुतण्यातील राजकीय वाद आता नवा राहिलेला नाही. या वादाचा नवा अंक दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपात दिसून आला. या जागावाटपात बिहारमधील एकूण ४० जागांपैकी नितीशकुमार यांच्या जेडीयूला १६, भाजपला १७ आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला ५ जागा मिळाल्या. या जागावाटपात पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पारस कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला.

जाहीरनामा कसा होतो तयार, निवडणूक आयोगाचे नियम काय? जाणून घ्या, ए टू झेड माहिती

पशुपती पारस यांची राजकीय ताकद काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पासवान परिवाराच्या इतिहासात डोकवावे लागेल. रामविलास पासवान आपले बंधू रामचंद्र पासवान यांना नेहमीच केंद्राच्या राजकारणात ठेवत होते. तर दुसरे बंधू पशुपती पारस यांना अलौली मतदासंघातून आमदारकी मिळवून देत होते. जेणेकरून पशुपती पारस यांच्या मदतीने स्थानिक राजकारणावर पकड ठेवता येईल. याच कारणामुळे रामविलास पासवान राष्ट्रीय आणि पशुपति पारस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत राहिले.

२०१९ मध्ये रामविलास पासवान राज्यसभेवर गेले त्यावेळी त्यांनी हाजीपुर हा सुरक्षित मतदारसंघ पशुपती पारस यांना दिला. त्यांना वाटलं असतं तर मुलगा चिराग पासवान यालाही मतदारसंघातून निवडून आणू शकले असते. त्यांच्यासाठी ही अवघड गोष्ट नव्हती. परंतु त्यांनी आपल्या भावाच्या राजकारणाला सेट करण्यावर भर दिला.

यानंतर सन २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी एनडीएपासून फारकत घेत नितीशकुमार यांच्या जेडीयूविरोधात उमेदवार उतरवण्याची रणनीती आखली. त्यावेळी पशुपती पारस कमालीचे नाराज झाले होते. या निवडणुकीत चिराग यांनी १४३ उमेदवारांना तिकीट दिले. यातील ४५ उमेदवारांनी जेडीयू उमेदवारांना पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली.

ज्यावेळी चिराग पासवान बॉलीवूडमध्ये नशीब आजमावत होते त्यावेळी बिहारमध्ये पशुपती पारस हेच पक्षाचे काम पाहत होते. अशा परिसथितीत पशुपती पारस यांना कमी लेखणे मोठी चूक ठरू शकते. जर पशुपति पारस यांनी हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर चिराग पासवान यांच्यासाठी अडचणी नक्कीच उभ्या राहू शकतात.

पोस्टर छापायलाही पैसे नाहीत, लढणार कसं?; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं कंबरडं मोडलं

सोरेन कुटुंबात कलह

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून सीता सोरेन आपल्या कुटुंबावर नाराज आहेत. त्यामुळे सीता सोरेन यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ज्यावेळी हेमंत सोरेन यांची राजकीय वारसदार म्हणून निवड करण्यात आली तेव्हापासूनच सीता सोरेन नाराज होत्या. तसं पाहिलं तर सोरेन कुटुंबाचे खरे राजकीय वारसदार सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन होते. परंतु त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर सीता सोरेन यांनी राजकारणात प्रवेश केला. हेमंत सोरेन यांना राजकारणात येण्याची इच्छा नव्हती परंतु अपघाताने ते राजकारणात आले असेच म्हणावे लागेल. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घडामोडींनंतर हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावे लागले. यानंतर चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळीही सीता सोरेन यांनी विरोध केला होता.

ठाकरे, पवार, बॅनर्जी कुटुंबात राजकीय वाद

महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब आणि शरद पवार-अजित पवार यांच्यातील राजकीय वादाचा फायदा भाजपलाच होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत राज ठाकरे यांनी खूप आधीच वेगळी वाट निवडली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा कलहाचा नवा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेतील वादाचा फायदा भाजपने आधीच घेतला आहे. आता जर राज ठाकरे एनडीए आघाडीत आले तर शिवसेनेच्या खास जागांवर मनसेच्या उमेदवारांना तिकीट दिले जाऊ शकते.

असेच वातावरण पश्चिम बंगालमध्येही दिसत आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाऊ बाबून बॅनर्जी यांच्यावर नाराज झाल्या आहेत. भावाबरोबरील सर्व नाते तोडल्याचे वक्तव्यही ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर दुसरीकडे त्यांच्या भावाने सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या भावाच्या नाराजीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होईल हे वेगळे सांगायला नकोच.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज