दिल्लीत खलबतं! पवारांच्या शिलेदाराच्या मध्यस्थीनं मविआला सुरूंग लावणारा भाजपचा प्लॅन

  • Written By: Published:
दिल्लीत खलबतं! पवारांच्या शिलेदाराच्या मध्यस्थीनं मविआला सुरूंग लावणारा भाजपचा प्लॅन

नवी दिल्ली : विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला सुरूंग लावण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे बोलले जात असून, हा सुरूंग शरद पवार यांच्या मध्यस्थिनं केला जात असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

…तर महाविकास आघाडीला सुरूंग लागलाच म्हणून समजा

दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेले पाहिजे, असा मतप्रवाह दिसून आला होता. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत. तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरु आहेत.

सर्व खासदार पवारांच्या बंगल्यावर 

एकीकडे पवारांच्या खास शिलेदाराने भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आता ही लोकं फोडत असून, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जर हे पाप केलं असतं तर माझ्यामध्ये हिम्मत नसती बाळासाहेब यांच्या नजरेला नजर मिळविण्याची पण मला वाटत नाही ते नोटरीचेबल असतील सर्व खासदार शरद पवारांच्या बंगल्यावर होते. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवारांशी बेईमानी करत नाहीत तर महाराष्ट्राची बेईमानी करतील असेही राऊत म्हणाले. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे. या राज्यात जे हुकूमशहा तयार झाले त्यांचा अंत फार वाईट झालेला असल्याची आठवणही यावेळी राऊतांनी करून दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube