“POK खाली करा, काश्मीर प्रश्नी कुणाचीही मध्यस्थी चालणार नाहीच”; भारतानं ठणकावलं!

India Pakistan Tension : भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे. यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा काहीच संबंध नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानने अवैध पद्धतीने ताबा घेतलेला पीओके त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडावाच लागणार आहे.
भारताचे हेच धोरण दीर्घकाळापासून आहे आणि यात कोणताही बदल झालेला नाही. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओत चर्चा झाली. या चर्चेनंतर युद्धविरामावर सहमती बनली होती. पाकिस्तानने त्याच दिवशी 12.37 वाजता चर्चेची विनंती केली होती. तांत्रिक कारणांमुळे संपर्क होत नव्हता. त्यानंतर भारतीय डीजीएमओंच्या उपलब्धतेनंतर 3.35 वाजता कॉल निश्चित करण्यात आला.
Video : भारताकडे डोळे वटारले तर, फक्त ‘विनाश’; आदमपूर एअरबेसवरून मोदींची पाकला ‘वॉर्निंग’
युद्धविरामाची विनंती पाकिस्ताननेच केली
युद्धविरामाची विनंती पाकिस्ताननेच केली (India Pakistan Ceasefire) होती. कारण त्याच दिवशी सकाळी भारतीय वायूसेनेने (Indian Navy) पाकिस्तानातील मुख्य एअर फोर्स ठिकाणांवर हल्ले केले होते. भारताची ताकदीने पाकिस्तानला गोळीबार आणि सैन्य कारवाई थांबवणे भाग पडले.
अन्य देशांबरोबर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले होते की 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत आहोत. या कारवाईत भारताने फक्त दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. जर पाकिस्तानी सैन्याने डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग भारतीय सैन्य देखील सडेतोड उत्तर देईल. पण जर पाकिस्तान थांबला तर भारतही हल्ले करणार नाही. हाच संदेश ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर दिला होता. परंतु, पाकिस्तानने त्याकडे दुर्लक्ष केले असे जयस्वाल यांनी सांगितले.
अमेरिकेशी काय चर्चा झाली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांबद्दल विचारले असता जयस्वाल म्हणाले, भारताची भूमिका स्पष्ट न डगमगणारी आहे. जम्मू काश्मीरच्या संदर्भातील कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानने काश्मीरचा जो भाग बेकायदेशीरपणे बळकावला आहे तो त्याला खाली करावाच लागणार आहे. 7 मे ते 10 मे पर्यंतच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही किंबहुना व्यापाराशी संबंधित कोणताही मुद्दा या चर्चेतच नव्हता.
सिंधू पाणीवाटप करार स्थगितच..
युद्धविरामानंतर सिंधू पाणीवाटप (Indus Water Treaty) करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या मुद्द्याव रणधीर जयस्वाल यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सिंधू पाणी करार हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेच्या आधारावर झाला होता. परंतु, पाकिस्तानने या गोष्टी कधीच मानल्या नाहीत. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला समर्थन देऊन या तत्वांना कमकुवत करण्यात आलं. 23 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीनुसार भारताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला स्थायी रुपाने समर्थन देणं बंद करत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.