भाजप नेते बंडखोर का होत नाहीत? ‘पॉलिटिक्स’ संपण्याची भीती की आणखी काही…

भाजप नेते बंडखोर का होत नाहीत? ‘पॉलिटिक्स’ संपण्याची भीती की आणखी काही…

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्ष करत आहेत. पण, अशोक चव्हाण, मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. थोडं इतिहासात डोकावलं तर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. आज हे दोन्ही नेते भाजपबरोबर सत्तेत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. ही महाराष्ट्रातील पक्षफूट आणि पक्षांतराची ताजी उदाहरणं. देशात पाहिलं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपसोबत घरोबा केला. या व्यतिरिक्त असे अनेक नेते आहेत ज्यांनी एकतर भाजपाचा झेंडा हाती घेतला किंवा भाजपबरोबर मैत्री करत स्वतःचं राजकारण सुरू ठेवलं.

पण, या सर्वात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पक्षाबरोबर बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत भाजप नेते फारसे दिसत नाहीत. ज्या नेत्यांनी बंडखोरी केली त्यातील बहुतांश नेते विरोधी पक्षांचे आहेत. यात भाजपाचे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही दिसत नाहीत. याचं मोठं उदाहरण म्हणून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमणसिंह यांच्याकडे पाहता येईल. या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयात मोठा वाटा उचलला. तेच मुख्यमंत्री होतील अशीच खात्री होती. परंतु, भाजपाने या नेत्यांना धक्का देत दुसरेच चेहरे पुढे केले.

हिमाचलमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले; भाजपच्या हर्ष महाजन यांना राज्यसभेची ‘लॉटरी’, सिंघवी पराभूत

या राजकारणानंतरही या नेत्यांनी पक्षाबरोबर बंडखोरी केली नाही. मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तरीही त्यांनी बंडखोरी का केली नाही असा प्रश्न सहज उपस्थित होतो. भाजपतील शिस्तीच्या कारभारामुळे की बंडखोरांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम काय होतात याची माहिती या नेत्यांना आहे म्हणून त्यांनी बंडखोरीचं पाऊल उचललं नाही, असे प्रश्न उपस्थित होतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये बंपर विजय मिळाल्यानंतरही या नेत्यांना डावलण्यात आलं. हीच परिस्थिती जर काँग्रेसमध्ये राहिली असती तर काँग्रेस केव्हाच फुटली असती. हे खरंही आहे. ममता बॅनर्जी, जगन मोहन रेड्डी याची जिवंत उदाहरणे आहेत. या नेत्यांनी काँग्रेस तोडली, स्वतःचे पक्ष स्थापन केले आणि आज त्यांच्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत.

भाजपच्या बाबतीत मात्र उलट परिस्थिती दिसते. भाजपशी बंडखोरी केलेल्या नेत्यांना एकतर पुन्हा भाजपच्याच आश्रयाला यावं लागतं किंवा राजकारणात ते इतके दुर्लक्षित होतात की त्यांना राजकारणातून संन्यासच घ्यावा लागतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गुजरात राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री केशुभाई पटेल. सन 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना हटवून नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं त्यानंतर पुढील वर्षातील विधानसभा निवडणुकीत पटेल यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही.

पुढे राज्यसभेच्या माध्यमातून ते केंद्राच्या राजकारणात गेले खरे पण 2007 मध्ये मात्र त्यांना पक्षाला धक्का देत बंडाचे निशाण फडकावले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. 2012 मध्ये तर त्यांनी स्वतःचा गुजरात परिवर्तन पार्टी नावाचा पक्षच काढला.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झालं त्यावेळी मात्र इच्छा नसतानाही केशुभाई पटेल यांनी आपला पक्ष भाजप मध्ये विलीन केला. थोडक्यात काय तर भाजप बरोबर बंडखोरी त्यांचं राजकारणच समाप्त करणारी ठरली.

Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’

भाजपच्या बंडखोरांचा यादीत दुसरं मोठं नाव म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह. ज्यावेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते त्यावेळी 1999 मध्ये कल्याण सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं होतं. यानंतर कल्याण सिंह यांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय क्रांती पार्टी असं त्यांच्या पक्षाच नाव होतं. पण पुढे तीन वर्षांच्या आतच त्यांच्या लक्षात आलं की नवीन पक्षाच्या जोरावर राजकारणात काहीच साध्य करता येणार नाही. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी पुन्हा भाजप जॉईन केली.

लोकसभा निवडणुक लढवली. जिंकले सुद्धा. पण 2009 मध्ये पुन्हा भाजपला रामराम करत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला. त्यांचा मुलगा राजवीर तर समाजवादी पार्टीत सहभागी झाला. 2009 मध्ये समाजवादी पार्टीच्या पाठिंब्याने खासदार झाले. पुढे मुलायम सिंह यादव यांच्या बरोबर मतभेद झाले आणि त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. पक्षाचं नाव ठेवलं जन क्रांती पार्टी. पण पुढे 2014 मध्ये पुन्हा भाजपात यावं लागलं.

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या बंडखोरीची स्टोरी सुद्धा अशीच काहीशी आहे. 2003 मध्ये भारतीय जनता पार्टीला मध्य प्रदेशात सत्ता मिळवून देणाऱ्या उमा भारती मुख्यमंत्री बनल्या. पण एका वर्षाच्या आतच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकू लागली. दहा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात अटक होईल हे निश्चित झाल्यानंतर ऑगस्ट 2004 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला.

अखिलेश यादवांना सर्वात मोठा धक्का : राज्यसभा मतदानाला काही मिनिटे बाकी असतानाच मुख्य प्रतोदांचा राजीनामा

पुढे काही दिवसांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी वाद झाल्यानंतर उमा भारती यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. परंतु आरएसएसच्या हस्तक्षेपा नंतर त्यांचं निलंबन रद्द झालं. यानंतर उमा भारती यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर कायम खटके उडत राहिले. त्यांची एकच मागणी होती की शिवराज सिंह चौहान यांना हटवून पुन्हा उमा भारती यांनाच मुख्यमंत्री बनवले जावे. केंद्रीय नेतृत्व मात्र बदल करण्याच्या मूडमध्ये नव्हते. परिणामी उमा भारती यांना पुन्हा पक्षातून काढून टाकण्यात आलं.

यानंतर उमा भारती यांनी भारतीय जनशक्ती पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. परंतु या पक्षाच्या जोरावर उमा भारती यांना राजकारणात काहीच साध्य करता आलं नाही. नाईलाजाने जून 2011 मध्ये त्यांना पुन्हा भाजपात यावं लागलं. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत उमा भारती यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आले. 2014 लोकसभा निवडणुकीत उमा भारती खासदार झाल्या त्यांनतर मोदी सरकारमध्ये मंत्री.

भाजपाचे आणखी एक बंडखोर बीएस येदियुरप्पा यांनी कोण कसं विसरु शकेल. हे तेच येडियुरप्पा आहेत ज्यांनी सायकल चालवून राज्यात भाजप मजबूत केली आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा मिळवली. पण पुढे लोकायुक्तच्या चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नितीन गडकरी, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू यांनाही घाम फुटला होता.

येदीयुरप्पा यांनी राजीनामा दिला त्यांना तुरुंगात जावं लागलं. थोड्या दिवसांनंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजप विरोधात बंड पुकारले. नवीन पक्ष स्थापन केला. पुढे भाजपात नरेंद्र मोदी युग सुरू झालं आणि येदीयुरप्पा यांनीही पुन्हा भाजपशी जुळवून घेतलं. सुरुवातीला खासदार झाले नंतर मुख्यमंत्री. आता त्यांचं राजकारण मुलगा विजयेंद्र चालवत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज