पतंजलीची ‘सोनपापडी’ चाचणीत फेल; सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना कारावास
Patanjali Soan Papdi : सुप्रीम कोर्टाकडून दणका बसल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या कंपनीला झटका देणारी आणखी एक घटना घडली आहे. कंपनीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडच्या पिथौरागढच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या तिघांना दंडही ठोठावला आहे. दंड भरला नाही तर शिक्षेच्या कालावधीत आणखी वाढ होणार असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
१७ ऑक्टोबर २०१९ रोजी एका अन्न सुरक्षा निरीक्षकाने पिथौरागढ येथील बेरीनाग येथील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानाची तपासणी केली होती. या ठिकाणी पतंजली कंपनीची इलायची सोनपापडी बाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या सोनपापडीचे काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर वितरक आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली होती.
रामदेव बाबांना ‘सुप्रीम’ झटका! आता योग शिबीरांसाठीही भरावा लागणार सेवाकर
यानंतर रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत सोनपापडीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. डिसेंबर २०२० मध्ये या तपासणीचा अहवाल राज्य अन्न सुरक्षा विभागाला मिळाला. ज्यामध्ये या मिठाईच्या खराब गुणवत्तेचे संकेत दिले होते. यानंतर विक्रेता, वितरक आणि पतंजली कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियम, २००६ च्या कलम ५९ नुसार तिघा जणांना सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंड ठोठावला. न्यायालयाने हा निकाल खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियम २००६ अन्वये दिला. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे उत्पादनाच्या निकृष्ट गुणवत्तेची माहिती देणारे होते, असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.
Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले..
दरम्यान, याआधी उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातली होती. सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाने कंपनीला मोठा झटका बसला आहे. कारण, या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. त्यानंतर आता पुन्हा उत्तराखंडमध्येच कंपनीला दुसरा मोठा दणका बसला आहे. सोनपापडी निकृष्ट आढळल्याने कंपनीच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.