नक्षलवादावर प्रहार! गरियाबंद चकमकीत 19 नक्षलींचा खात्मा; सुरक्षा दलांची धाडसी कामगिरी

नक्षलवादावर प्रहार! गरियाबंद चकमकीत 19 नक्षलींचा खात्मा; सुरक्षा दलांची धाडसी कामगिरी

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. भारतीय सुरक्षा दलांची ही कारवाई धाडसाची ठरली. नक्षलवाद्यांना शोधून ठार करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षा दलाकडून ठिकठिकाणी शोध अभियान राबवण्यात येत आहे. शोध मोहिम सुरुच असून आणखी मृतदेह हाती लागतील असा अंदाज आहे. दुसरीकडे नक्षल्यांकडूनही अधूनमधून गोळीबार केला जात आहे. सोमवारी सायंकाळी सुरक्षा दलांनी मैनपूर पोलीस हद्दीतील कुल्हाडी घाट परिसरातील भालू डिग्गी जंगलात शोध मोहीम सुरू केली होती. या दरम्यान 19 नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले.

मोठी बातमी! विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, सुरक्षा दलाची व्हॅन उडवली, IED स्फोटात 9 जवान शहीद

एक कोटींचे इनामी नक्षली ठार

चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांत त्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य मनोज आणि स्पेशल झोनल कमिटी सदस्य गुड्डू यांचा समावेश आहे. मनोजवर एक कोटी तर गुड्डूवर 25 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. मनोज हा ओडिशा राज्याचा प्रमुखही होता. याच प्रकारे एक कोटी रुपयांचे इनाम असलेला आणखी एक नक्षली जयराम उर्फ चलपती देखील या चकमकीत मारला गेला आहे. या चकमकीत काही महिला नक्षलींचाही मृत्यू झाला आहे.

ड्रोनच्या मदतीने नक्षलींवर वॉच

सुरक्षा दलांनी छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या हद्दीवर ही कारवाई केली आहे. या मोहिमेत दहा पथकांनी सहभाग घेतला होता. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ऑपरेशन सुरू झाले होते. ओडिशा पोलिसांची तीन पथके, छत्तीसगड पोलिसांची दोन पथके आणि पाच सीआरपीएफची पथके यात सहभागी झाली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोबरा बटालियन आणि एसओजी पथकाचा नक्षल्यांशी सामना झाला. या दरम्यान गोळीबार सुरू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत चकमक सुरुच होती. ड्रोनच्या मदतीने नक्षल्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube