विरोधकांचे पक्ष फोडून त्यांना तुरुंगात टाकता; पाकिस्तानसमोर मात्र….राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घाव

Sanjay Raut Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दिवस उलटूनही भारताकडून पुरेसे प्रतिशोध नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Attack) त्यांनी सरकारच्या कारवाईला ‘नाड्या आवळणे आणि सोडणे’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्धच्या कृतींना खरा बदला म्हणता येणार नाही, असंही म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता?
पहलगाम हल्ल्याला १२ दिवस होऊन गेले आहेत. याचा बदला काय घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, पाकिस्तानचे २१ युट्यूब चॅनल बंद केले. पाकिस्तानच्या हायकमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता. त्यांचं आयुष्य उद्धवस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. बदला घेता ना, आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको. संपवून टाकायचं. मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली, युट्यूब चॅनल बंद केलं, याला बदला घेणं म्हणतात का? असा संतप्त सवाल संजय राऊतांनी व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यामागे कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड? धक्कादायक अपडेट
२७ लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा. इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरु इंदिरा गांधींचा त्रास होतो. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, कोणाला मूर्ख बनवताय, पंतप्रधान इथून तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात, लोकांना मुर्ख बनवतात. काहीही बदला घेतलेला नाही. शांतपणे आनंदात, सुखाने चाललं आहे. मला या देशाची आता भीती वाटते, असेही संजय राऊत म्हणाले.
याला बदला म्हणतात का?
हे अशाप्रकारचे राज्यकर्ते जर देशात असतील आणि शत्रू जर इतका समोर माजलेला असेल तर आमची बदल्याची पद्धत काय तर युट्यूब बंद करायचं आणि नाड्या आवळायच्या हे बंद करा. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुन चुन के मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. १२ दिवस झाले तरी हे बदला घेतात. आता युद्ध सराव करत आहेत. याला बदला म्हणतात का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.