‘मी देखील 20 वर्षापासून असाच अपमान सहन करतोय’; धनखड यांच्या अवमानप्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
PM Modi On Jagdeep Dhankhad Mimicry : संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची नक्कल आणि मिमिक्री केली. दरम्यान, हे प्रकऱण चांगलचं तापलं असून यावरून भाजपने तीव्र निषेध केला. धनखड यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आता पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती आहे.
गडचिरोलीत आश्रमाशाळेतील मुलींच्या जीवाशी खेळ; जेवणातून विषबाधा, 73 विद्यार्थी गंभीर
कल्याण बॅनर्जी यांच्यासह १४१ खासदारांना काल संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर कल्याण बॅनर्जी संसदेबाहेर उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवताना दिसले. यावेळी तिथं राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधींनी या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जगदीप धनखड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. काही खासदारांनी काल परमपवित्र संसदेच्या आवारात केलेल्या नकलेच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं. मला पंतप्रधान मोदींना सांगितले की, गेल्या २० वर्षापासून ते देखील असाच अपमान सहन करत आहेत. पण, भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदाशी आणि तेही पवित्र संसदेत असं वागणं हे दुर्देवी आहे.
भारताला नवा गुन्हेगारी कायदा मिळणार; गुन्हेगारी कायद्याशी संबंधित तीन विधेयकं मंजूर
धनखड यांनी लिहिलं की, मी पंतप्रधानांना सांगितले की, काही लोकांच्या मूर्खपणाच्या हरकती मला माझे कर्तव्य बजावण्यापासून आणि आपल्या संविधानात दिलेल्या तत्त्वांचा आदर करण्यापासून रोखू शकत नाहीत. मी संवैधानिक मूल्यांसाठी वचनबद्ध आहे आणि अशा अपमानांनी मी माझ्या मार्गावरून हटणार नाही, असं धनखड यांनी लिहिलं.
राष्ट्रपतींकडूनही प्रतिक्रिया
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, “माननीय उपराष्ट्रपतींचा संसदेच्या आवारात ज्या प्रकारे अपमान करण्यात आला त्यामुळे मी निराश झालो आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मानाच्या आणि शिष्टाचाराच्या मर्यादेत असली पाहिजे. आम्हाला या संसदीय परंपरेचा अभिमान आहे आणि ती कायम राहिली पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा आहे, असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं.
दरम्यान, कल्याण बॅनर्जी म्हणाले की, मला जगदीप धनकड यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते आपल्या राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ते उपराष्ट्रपती आहेत. मी केवळ एक कला सादर केली. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत नक्कल केली होती. सर्वांनी ते सहज घेतलं होतं, असं बॅनर्जी म्हणाले होते.