Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं

Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं

First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली होती. श्रीराम मूर्तीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज (Arun Yogiraj) यांनी ही मूर्ती बनवली आहे. मंदिरात आणण्याआधी मूर्तीचे परिसरात भ्रमण करण्यात आले. त्यानंतर मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली.

भाजपकडून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट; कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथलांचे टीकास्त्र

राम मंदिर उद्घाटनाची तयारी सुरू आहे. येत्या सोमवारी प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा होणार आहे. त्याआधी 16 जानेवारीपासून विविध धार्मिक विधी येथे सुरू आहेत. काल गुरुवारी श्रीराम मूर्ती गर्भगृहात आणण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. काशीवरून आलेल्या पुरोहितांच्या पथकाने विधी केले. यानंतर काल रात्री रामलल्लांचा पहिला फोटो समोर आला. या फोटोत राम मंदिराच्या बांधकामातील कामगार मूर्तीसमोर हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. हा क्षण त्यांच्यासाठी भारावणारा असाच होता. त्यामुळेच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.

कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. राम मूर्ती तयार करण्यासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार काम करत होते. त्यात योगीराज यांनी तयार केलेली मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मूर्ती तयार करण्याच्या कामात योगीराज यांनी स्वतःला अगदी झोकून दिले होते. या काळात त्यांनी मोबाइलही हातात  घेतला नाही. कुटुंबियांशीही त्यांचे बोलणे होत नव्हते.

राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं? विश्वस्त चंपत राय यांनी तारीखच सांगितली

दरम्यान, येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही. राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.

14 जानेवारीला संक्रांतीपासून 10 दिवसांचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube