“केजरीवालांनी पक्ष स्थापन केला अन् तेव्हाच मी..” अण्णा हजारेंनी नेमकं काय सांगितलं?
![“केजरीवालांनी पक्ष स्थापन केला अन् तेव्हाच मी..” अण्णा हजारेंनी नेमकं काय सांगितलं? “केजरीवालांनी पक्ष स्थापन केला अन् तेव्हाच मी..” अण्णा हजारेंनी नेमकं काय सांगितलं?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/06/anna-hajare_V_jpg--1280x720-4g.webp)
Anna Hajare on Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Delhi Election Results 2025) सुरू आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांची मतमोजणी सुरू असून सत्ताधारी आम आदमी पार्टीला तगडा झटका बसला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीचं तख्त काबीज करेल असे सध्या दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने 46 जागांवर आघाडी घेतली आहे. यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हापासून आमचा संवाद बंद झाला आहे, असे हजारे म्हणाले आहेत.
सामाजिक कार्य करण्यासाठी मी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची साथ दिली होती. परंतु, आता कुणावरही आरोप करण्याची इच्छा नाही. जो करेल तो निश्चित भरेल. मतदान करताना लोकांनी आधी उमेदवाराचं आचरण, विचार आणि त्याचं आयुष्य कसं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. जो निष्कलंक आणि प्रामाणिक असेल अशाच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे.
“दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, काँग्रेस अन् आप..” राऊतांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी!
यानंतर अण्णा हजारेंना पत्रकारांनी अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत प्रश्न विचारला. त्यावर अण्णा म्हणाले, सुरुवातीच्या काळात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने अरविंद केजरीवाल माझ्यासोबत आले होते. पण ज्यावेळी त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे आता मी त्यांच्याबाबतीत काही बोलणार नाही.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलन दिल्लीत झाले होते. या आंदोलनात अरविंद केजरीवाल एक प्रमुख चेहरा होते. या आंदोलनानंतर आम आदमी पक्षाची स्थापना झाली होती. यानंतर 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 28 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत तर आम आदमी पक्षाचीच लाट आली होती. परंतु, आता 2024 च्या निवडणुकीत मात्र आम आदमी पार्टीचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.
दिल्लीत भाजपाची मुसंडी, 46 जागांवर आघाडी
निवडणूक सकाळी साडेअकरा वाजता दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने 46 जागांवर आघाडी घेतली होती. तर आम आदमी पक्षाने 24 जागांवर आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीला जबर दणका बसताना दिसत आहे. हीच परिस्थिती शेवटपर्यंत राहिली तर भाजप तब्बल 26 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करील असे दिसत आहे. काँग्रेसलाही या निवडणुकीत काहीच करता आले नाही. पक्षाची पाटी कोरीच राहणार की काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दिल्लीत अबकी बार भाजप की सरकार; आम आदमी पक्षाचा सुपडा साफ