“दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, काँग्रेस अन् आप..” राऊतांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी!
![“दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, काँग्रेस अन् आप..” राऊतांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी! “दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, काँग्रेस अन् आप..” राऊतांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी!](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/11/Sanjay-Raut-2-1_V_jpg--1280x720-4g.webp)
Sanjay Raut on Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Delhi Election Results 2025) सुरू आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांची मतमोजणी सुरू असून सत्ताधारी आम आदमी पार्टीला तगडा झटका बसला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीचं तख्त काबीज करेल असे सध्या दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला असे राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आप एकत्र राहिले असते तर चांगलं झालं असतं. दोघांचाही शत्रू भाजप आहे. दोन्ही सोबत असते तर सुरुवातीच्या एकाच तासात जिंकले असते. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला जात आहे. नेतृत्वाला संपवून टाका. जो कुणी पीएम मोदी यांच्यासमोर उभा राहिल त्याला संपवून टाका. हेच हरियाणात झालं होतं. महाराष्ट्रात 39 लाख मतं मतदार यादीत टाकण्यात आली आणि निवडणुका जिंकल्या असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
संजय राऊत हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; मंत्री नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
दरम्यान, दिल्ली निवडणूक मतमोजणीच्या आधी काँग्रेस खासदार राहुल गांंधी, संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच घोळ झाल्याचा दावा केला होता. पाच महिन्यांत लाखो मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी केला होता. यावर निवडणूक आयोगाने उत्तरही दिले होते. तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. दिल्ली निवडणुकीत पराभव दिसत असल्यानेच ही नौटंकी सुरू केल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.
दिल्लीत भाजपाची मुसंडी, 45 जागांवर आघाडी
निवडणूक सकाळी साडेअकरा वाजता दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने 45 जागांवर आघाडी घेतली होती. तर आम आदमी पक्षाने 25 जागांवर आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीला जबर दणका बसताना दिसत आहे. हीच परिस्थिती शेवटपर्यंत राहिली तर भाजप तब्बल 26 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करील असे दिसत आहे. काँग्रेसलाही या निवडणुकीत काहीच करता आले नाही. पक्षाची पाटी कोरीच राहणार की काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.