Breaking! मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, अनेक जखमी

आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. अनेक जण गंभीर जखमी झाले.

Terrorist Attack On Assam Rifles

Terrorist attack on Assam Rifles in Manipur : मणिपूर पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांनी हादरले आहे. आज संध्याकाळी बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला

घटना सायंकाळी 5:50 च्या सुमारास नंबोल सबल लाईकाईजवळ (Terrorist Attack) घडली. इम्फाळहून बिष्णुपूरला जात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या टाटा 407 वाहनावर हल्लेखोरांनी अचानक गोळीबार (Manipur) सुरू केला. हल्ला इतका तीव्र होता की, जवानांना प्रतिसाद देण्याची (Assam Rifles) संधीही मिळाली नाही.

शोधमोहीम सुरू

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस आणि आसाम रायफल्सकडून संयुक्त शोधमोहीम सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता असून ताफ्याच्या मार्गावर सुरक्षा त्रुटी होत्या का? याचा तपास सुरू आहे.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी ट्विट करताना लिहिले, नांबोल सबल लीकाई येथे आपल्या 33 आसाम रायफल्सच्या शूर सैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबद्दल ऐकून मला खूप धक्का बसला आहे. दोन सैनिकांचे बलिदान हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. या कृत्याच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून केंद्र सरकारकडूनही सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा ईशान्येकडील भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

follow us