महाकुंभात अग्नितांडव! आगीत अनेक तंबू जळून खाक; कारण अस्पष्ट

महाकुंभात अग्नितांडव! आगीत अनेक तंबू जळून खाक; कारण अस्पष्ट

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) सुरू आहे. या मेळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी आज पुन्हा आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग आटोक्यात आणण्याच्या कामास सुरुवात झाली. ही घटना शंकराचार्य मार्गावरील सेक्टर 18 मध्ये घडली. या आगीत येथील अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. मोठ्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तंबूतील लोकांना बाहेर काढण्यात आले. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना येथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. खाक चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश चतुर्वेदी म्हणाले, ओल्ड सिटी रोडवरील तुलसी चौकाजवळील एका कॅम्पमध्ये आग लागली. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी वेळेवर पोहोचले. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली.

याआधी महाकुंभमेळ्यातील सेक्टर 22 बाहेरील चमनगंज चौकीजवळ आग लागली होती. ही घटना 30 जानेवारी रोजी घडली होती. या आगीत 15 तंबू जळाले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा यांनी सांगितले होते की आग लवकर आटोक्यात आणली. रस्त्यांची कमतरता असल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही.. अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?

महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या (Mahakumbh Stampede) दुसऱ्या दिवशी आगीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 60 जण जखमी झाले होते. मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांत धक्काबुक्की होत होती. याच दरम्यान येथे पळापळ होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (29 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. महाकुंभाचे डिआयजी वैभव कृष्ण यांनी या घटनेसाठी गर्दीच्या दबावाला जबाबदार धरलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube