कुणी धुणी-भांडी करणारं तर, कुणी शेतकऱ्याचं पोर; बंगालमध्ये कोण कोण आमदार झालं?
West Bangal यंदा बंगालच्या विधानसभेने सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना नाही, तर हातावर फोड आलेल्या श्रमिकांना आपलं मानलं आहे
Kalita Manjhi story From Domestic Worker to BJP MLA : पश्चिम बंगालच्या राजकारणात यंदा एक नवी पहाट उगवली आहे. सत्तेची समीकरणं बदललीच, पण त्याहूनही मोठं परिवर्तन विधानसभेच्या पायऱ्या चढणाऱ्या चेहऱ्यांमध्ये दिसतंय. ज्या हातांनी कालपर्यंत दुसऱ्याच्या घरची धुणी-भांडी केली, ज्या खांद्यांनी नांगर ओढला आणि ज्या नजरांनी गरिबीचं अस्मानी संकट सोसलं, तीच सामान्य माणसं आज ‘आमदार’ म्हणून मिरवत आहेत. आउसग्राममधून निवडून आलेल्या घरकामगार कलिता मांझी असोत किंवा शेतकरी कुटुंबातील चेहरे आहेत. घराघरात चर्चा असणाऱ्या अशाच काही ‘सामान्यांतल्या असामान्य’ आमदारांची ही प्रेरणादायी यशोगाथा…
ज्या हातांनी अनेक वर्षे दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी केली, ज्या हातांनी गरिबीचे चटके सोसत संसाराचा गाडा ओढला, आज त्याच हातांमध्ये पश्चिम बंगालच्या जनतेने आपल्या भविष्याची सूत्रे सोपवली आहेत. आउसग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कलिता मांझी यांची गोष्ट केवळ एका विजयाची नाही, तर ती एका सामान्य महिलेच्या असामान्य जिद्दीची आणि आत्मसन्मानाची आहे.
२,५०० रुपयांच्या पगारात काढले दिवस
गुस्कारा नगरपालिकेच्या एका छोट्याशा घरात राहणाऱ्या कलिता मांझी लोकांच्या घरी घरकाम करायच्या. महिन्याला मिळणारे जेमतेम 2,500 ते 4,500 रुपये आणि नवऱ्याची प्लंबरची तुटपुंजी कमाई… अशा परिस्थितीत कलिता यांनी आयुष्य व्यतीत केले. पण गरिबीने त्यांच्या स्वप्नांना कधीच साखळदंड घातले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि आज त्या विजयी होऊन थेट विधानसभेत पोहोचल्या आहेत.
विजयाचा आनंद आणि सासूच्या हाताचा ‘आलू-झोल’
विजयाची घोषणा झाली, गुलालाची उधळण झाली, पण कलिता यांचं मन मात्र आपल्या घराकडे लागलं होतं. रात्री उशिरा विजयाचं प्रमाणपत्र घेऊन जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा कोणताही मोठा जल्लोष नव्हता की पंचपक्वान्नाचे ताट नव्हते. दिवसभराच्या धावपळीनंतर थकलेल्या कलिता यांनी आपल्या सासूच्या हाताचा ‘आलू-पोटोलर झोल’ (बटाट्याची भाजी) आणि भात खाल्ला. आमदार झाल्यानंतरही त्यांचा हा साधेपणा काळजाला भिडणारा आहे.
‘शपथविधीला नेसायला साडी नाही…’
एका आमदाराच्या मनात विजयानंतर काय विचार असतील? पण कलिता वेगळ्या आहेत. त्या हळहळत म्हणतात, “मला पती आणि मुलाला कोलकात्याला शपथविधीसाठी न्यायचं आहे, पण त्या मोठ्या सोहळ्याला नेसून जाण्यासाठी माझ्याकडे एक चांगली साडीही नाही.” एका लोकप्रतिनिधीची ही प्रांजळ कबुली ऐकून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. ज्यांच्या घरी त्या 20 वर्षे काम करत होत्या, त्या मालकाने ही गरज ओळखून त्यांना साडी भेट देण्याचे ठरवले आहे. हे नातं राजकारणापलीकडच्या माणुसकीचं आहे. कलिता मांझी यांचा हा विजय लोकशाहीचा सर्वात सुंदर चेहरा आहे. हा विजय सांगतो की, लोकशाहीत ‘राजाचा मुलगाच राजा’ होत नाही, तर कष्ट करणारी एक सामान्य महिलाही आपल्या कर्तृत्वाने सत्तेच्या शिखरावर पोहोचू शकते.
ही झाली कलिता मांझी यांची स्टोरी पण, कलिता यांच्यासोबतच आणखीनही काही चेहरे आहेत ज्यांच्या विजयाची चर्चा बंगालसह देशभरात होत आहे. यामध्ये रेखा पात्रा, बाग हेमंत, सर्मिष्ठा पुरकाईत, तापस मंडल यांचा समावेश आहे. रेखा पात्रा या संदेशखाली आंदोलनातील एक प्रमुख चेहरा होत्या. त्या एका सामान्य गृहिणी असून त्यांनी स्थानिक महिलांच्या हक्कासाठी लढा दिला होता. पात्रा हिंगलगंज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 2026 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना हिंगलगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. संदेशखाली येथे टीएमसी सदस्यांकडून झालेल्या सामूहिक बलात्काराच्या त्या बळी ठरल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी टीएमसी उमेदवाराचा 5000 हून अधिक मतांनी पराभव केला. त्या लोकसभा निवडणुकीत हरल्या, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. एका पीडित महिलेने थेट विधीमंडळात पोहोचणे हा बंगालच्या राजकारणातील मोठा बदल मानला जात आहे.
बाग हेमंत बाग हे साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत. आरामबाग सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांचा विजय हा स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्मिष्ठा पुरकाईत या मग्रहाट पूर्व मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या ग्रामीण भागातील महिलांचे प्रतिनिधित्व करतात आणि पक्षाच्या तळागाळातील संघटन कौशल्यामुळे त्या आमदार बनू शकल्या आहेत. तर, रायदिघी मतदारसंघातून निवडून आलेले तापस मंडल हे सामान्य कुटुंबातील आहेत. सुंदरबनच्या दुर्गम भागात राहून त्यांनी लोकांच्या प्रश्नांवर काम केले आणि या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.