अजितदादा कर्जत-जामखेडमधून लढणार; आणखी एक पर्याय शोधला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची (Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. अजित पवार यांनी राज्यात जन सन्मान यात्रा काढली आहे. पण त्यांनी आता बारामती विधानसभा (Baramati Assembly constituency) मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. सात- आठ वेळा बारामती मतदारसंघातून लढलो आहे. आता इंटरेस्ट नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातून ते आपले धाकटे पूत्र जय यांना संधी देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास बारामतीमध्ये शरद पवार गटाचे युगेंद्र पवार व अजित पवार गटाचे जय पवार या दोन्ही चुलत भावांमध्ये लढत होऊ शकते. त्यात आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी अजित पवार हे कुठल्या मतदारसंघातून लढू शकतात, याबाबत मोठा दावा केलाय.
सुनेत्रा पवारांना उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा; अजित पवारांचा मोठा खुलासा
अजित पवार हे इंदापूर किंवा कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. तशी त्यांच्याकडून चाचपणी केली जात असल्याची पुष्टीही रोहित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. डिझायन बॉक्स एजन्सीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सर्व्हेचे काम दिले आहे. त्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. ही एजन्सी राज्यभरात सर्व्हे करत आहेत. तसेच काय भाषण करावे याही सूचना एजन्सी देत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून अजित पवार लढल्यास काय होईल, याचा सर्व्हे करण्यात येत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच इंदापूर विधानसभेचा पर्यायावर ते विचार करत असल्याचा रोहित पवार यांनी म्हटले आहे. अजितदादा हे विधानसभा न लढल्यास हे विधानपरिषदेवरही जाऊ शकतात, असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं ‘हे’ उत्तर
कर्जत-जामखेडच का?
कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे निवडून आलेले आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. त्या पक्षाला जागा असे सूत्र महायुतीमध्ये ठरल्यास ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळेल. तसेच अजित पवार यांचा अंबालिका हा खासगी साखर कारखाना कर्जतमध्ये आहे. तसेच अजित पवार यांना मानणारे कार्यकर्तेही मतदारसंघात आहे. त्यामुळे तशी चाचपणी अजित पवार यांच्याकडून होऊ शकतो. तसेच भाजपकडून राम शिंदे हे इच्छुक आहे. परंतु ते सध्या विधानपरिषदेवर आहे. शिंदे व्यतिरिक्त भाजपमध्ये प्रबळ असा दावेदारही नाही. त्यामुळे अजित पवारांना ही जागा महायुतीमध्ये मिळू शकते. तसेच झाल्यास रोहित पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगू शकतो.