या वयात इतके खोटे बोलायचे नसते; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके खोटे बोलायचे नसते. काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी. ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत. तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी x वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये टाटा-एअरबस प्रकल्पाच्या एमओयुबद्दल सांगितलं आहे. त्यांनी रतन टाटा यांचे 24 सप्टेंबर 2021 रोजीचे ट्विट, हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे वृत्त 14 फेब्रुवारी 2022 मध्ये आल्याचं सांगितलं आहे. एमओयूच्यावेळी गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांचा विचार होत होता, असं म्हणत फडणवीसांनी वृत्त देखील शेअर केलंय.
फडणवीस म्हणाले की, आता या संपूर्ण कालखंडात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होते. त्यांच्याच काळात टाटांचे अधिकारी नागपुरात एमएडीसीच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना प्रतिसाद द्यायलाही कुणी तयार नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये 4 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाने त्यावर सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
फॉक्सकॉनने पहिलं पत्र महाराष्ट्राला 5 जानेवारी 2022 ला लिहिलं होतं. फडणवीसांनी याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 5 मे 2022 रोजी फॉक्सकॉनकडून दुसरे पत्र, 14 मे 2022 रोजी उद्योग विभागाकडे फॉक्सकॉनचा रितसर अर्ज, 24 मे 2022 रोजी दावोस येथे प्रतिनिधी मंडळाची वेदांता समूहाशी चर्चा, 24 मे 2022 रोजी तळेगाव येथील जागेची पाहणी,13 जून 2022 रोजी फॉक्सकॉनला पॅकेज (पण, उच्चस्तरिय समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता नसलेले, जी बैठक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत म्हणजे 29 जून 2022 पर्यंत एकदाही झाली नाही.) 24 जून 2022 रोजी फॉक्सकॉन समूहाच्या अध्यक्षांशी तत्कालिन उद्योगमंत्र्यांची चर्चा झाली, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
अजितदादांचा भाजपला धक्का; विरोध असतानाही नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर
राज्यात एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे सरकार आल्यावर 14 जुलै रोजी वेदांता समूहाकडून पहिलं पत्र आलं. 26 जुलै रोजी मुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाली. लगेच उपसमितीची बैठक घेत, 38,000 कोटींचे पॅकेज मंजूर केले. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नाही, असे त्यावेळचे उद्योगमंत्री वारंवार सांगत होते, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
या वयात इतके खोटे बोलायचे नसते…
काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी,
ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत.
तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा… pic.twitter.com/1vgOGSR6X0— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 29, 2024
टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो, किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता. कंपनीने 2 मार्च 2021 लाच हैद्राबादमध्ये त्यांच्या प्रकल्पाचं उदघाटन केलं होतं. पण, आमचं सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या सर्वाबाबत मी स्वत: मंत्रालयात एक पत्रपरिषद घेतली होती. सर्व मुद्यांचं सविस्तर सादरीकरण केलं होतं. पण, पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य आहे. एकिकडे 52 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे. दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी. राज्यातील जनताच याचा निकाल 20 नोव्हेंबरला लावेल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.