छगन भुजबळांनी पक्कं ठरवलंय… यंदा सुहास कांदेंना चेपवायचच!
“समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!”
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या फक्त शुभेच्छा नव्हत्या. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे वादाची एका वाक्यात पेटवेली वात होती. बुधवारपासून छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे यांच्यातील वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. याला कारण याच शुभेच्छा ठरल्या आहेत. हा वाद सुरु असतानाच नांदगावमध्ये बुधवारी रात्री जंगी अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन केले होते. यावेळीही भुजबळ यांनी पुन्हा एकदा “समीर यांना माझे आशीर्वाद आहेतच. नांदगावकरांच्याही शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांना लाभो. मुंबई, नाशिक, येवला, नांदगाव आणि सगळा महाराष्ट्र समाजकार्यासाठी तुमची वाट पाहत आहे, असे म्हणत दुसऱ्यांदा समीर भुजबळ आणि नांदगाव-मनमाड मतदारसंघ यांना एकत्रित आणले.
भुजबळ यांच्या या पेरणीवर सुहास कांदेंनी लागल्या हाताने नांगर फिरवला. पाच वर्षे भुजबळ या मतदारसंघात दिसले नाहीत. मात्र आठ दिवसांपासून विविध कार्यक्रम घेत आहेत. पंकजभाऊंची एकदा इच्छा पूर्ण झाली आहे. आता समीरभाऊंचीही इच्छा पूर्ण करायची आहे, असे म्हणत कांदेंनी पराभवाची आठवण करुन देत जुन्या जखमांची खपली काढली. इतकेच नाही तर भुजबळांनी स्वत: उभं राहावे, मी आपल्यासमोरही लढायला तयार आहे. जर मला पक्षाने आदेश दिला तर मी येवल्यातूनही उभं राहायला तयार आहे, असं आव्हानच सुहास कांदेंनी देऊन टाकले. कांदे यांना सपोर्ट म्हणून मग मंत्री दादा भुसेही मैदानात उतरले. नांदगाव-मनमाडमध्ये शिवसनेचा स्टँडिंग आमदार आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचाच उमेदवार असेल असे त्यांनी जाहीर केले.
एकूणच या वादामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पण या वादाचे मूळ नेमके काय आहे? आणि भुजबळ नांदगाव-मनमाडमध्ये पेरणी का करत आहेत? पाहुयात. (Chhagan Bhujbal vs. Suhas Kande controversy started again in Nandgaon Assembly Constituency)
नांदगाव मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पण 1990 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी मतदारसंघात लाल निशाण फडकवले. 1995 मध्ये भाजप-शिवसेना लाटेत नांदगावकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले. राजेंद्र देशमुख या मतदारसंघातील शिवसेनेचे पहिले आमदार झाले. 1999 मध्ये काँग्रेसच्या अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. 2004 मध्ये संजय पवार यांनी पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला. इथेपर्यंत काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना होता. 2009 मध्ये मात्र राजकीय बदलाचे वारे जोरदार वाहू लागले होते. भुजबळ यांनी आघाडीच्या जागा वाटपात नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला आणि तिथून पंकज भुजबळ यांना रिंगणात उतरवले.
त्यावेळी शिवसेनेच्या संजय पवारांचा 21 हजार मतांनी पराभव करत छगन भुजबळ यांनी मुलाला निवडूनही आणले. शेजारच्या येवला मतदारसंघातून स्वत: छगन भुजबळ आमदार झाले. मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्रीही झाले. इकडे नाशिकमध्ये पुतण्या समीर भुजबळ खासदार झाले होते. एकूणच नाशिकची सगळी सत्ताकेंद्र भुजबळ यांच्या घरात होती. 2014 मध्ये मात्र मोदी लाटेने राजकारण फिरवलं. नाशिकमध्ये समीर यांचा पराभव झाला. पंकज भुजबळ यांच्याही आमदारकीवर तेव्हाच घाव बसला असता. शिवसेनेनेही पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. सुहास कांदेंसारख्या शिवसैनिकाला मैदानात उतरवले होते. पण शिवसेना आणि भाजपमधील मतविभागणीचा फायदा पंकज यांना झाला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळविला. त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना 50-50 हजार मते मिळाली होती. तर पंकज भुजबळ यांना 69 हजार मते पडली होती.
2016 मध्ये छगन भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वाला सगळ्यात मोठा धक्का बसला. भ्रष्टाचाराच्या आरोपात ते तब्बल दीड वर्ष तुरुंगात गेले. इकडे वडील तुरुंगात गेल्याचे बघून सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना खिंडीत गाठलं. अचानकपणे सगळीच जबाबदारी पंकज यांच्यावर येऊन पडली होती. येवला आणि नांदगावमध्ये धावपळ होऊ लागली. राजकारण आणि इतर गोष्टींमध्ये दमछाक होत होती. ही संधी साधून सुहास कांदेंनी नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादी पोखरायला सुरुवात केली. भुजबळ यांच्याभोवतीच्या अनेक दिग्गजांना शिवसेनेत घेतले. मनमाड आणि नांदगावच्या नगरपालिकेवर भागवा फडकवला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली. नांदगावमध्ये कांदे यांनी अडीच वर्षांच्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले.
हे धक्के पचवत असतानाच लोकसभेला नाशिकमधून समीर भुजबळ यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. इकडे कांदे यांनी भुजबळ यांच्या घरातून एक आमदारकीही मायनस केली. 2019 मध्ये तब्बल 13 हजारांच्या मताधिक्याने सुहास कांदे यांनी पंकज यांचा पराभव केला. छगन भुजबळ यांच्यासाठी हे दु:ख न पचणारचं होतं. या दु:खातून सावरण्यासाठी त्यांना मदत झाली महाविकास आघाडी सरकारची. भुजबळ मंत्री झाले, पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रीही झाले. आता कांदे आणि भुजबळ एकाच सरकारमध्ये होते. पण कांदे शांत बसले नव्हते. एका सरकारमध्ये असूनही डीपीडीसी बैठकीत भुजबळांना नडत होते. निधीच्या मुद्द्यावरून घेरत होते. दोघांचा वाद संपूर्ण राज्यात गाजला होता. महायुतीचे सरकार येताच कांदे यांनी भुजबळांनी मंजूर केलेल्या निधीला आणि कामांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्टे आणला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता.
यंदा छगन भुजबळ नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होते. आपल्याला किंवा किमान आपल्या घरात तिकीट द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांनी त्यांचे हे राजकीय इप्सित साध्य होऊ दिले नाही. त्यानंतर भुजबळांनी राज्यसभेसाठी तयारी सुरु केली. पण अजितदादांनी तिथे सुनेत्रा पवारांना खासदार केले. त्यामुळे आता समीर किंवा पंकज यांना तरी नांदगावमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी अजितदादांकडे केली आहे. लोकसभेवेळीच भुजबळ यांनी त्यांचे नेटवर्क अॅक्टिव्ह केले होते. पण त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. ज्याचा आमदार त्याची जागा असा फॉर्मुला ठरला असतानाही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यायचा अशी भुजबळ यांची योजना आहे. यातून कांदे यांनाही धडा शिकवायचा आणि समीर यांचेही राजकारण सेट करुन द्यायचे असा दुहेरी हेतू त्यांनी ठेवला आहे.
पण लोकसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना 41 हजारांचे लीड मिळाले आहे. या लीडमागे सर्वात मोठा वाटा कांदे यांचाच होता, हे स्वतः भारती पवारही मान्य करतील. यातून सुहास कांदे यांचा मोठा प्रभाव आणि वरचष्मा असल्याचे दिसून आले, त्यामुळेच कांदे यांची एक प्रकारे उमेदवारीही फिक्स केल्याचे बोलले जाते. कांदेंनी विधानसभेच्या दृष्टीने विरोधातील पाच पैकी संजय पवार आणि राजेंद्र देशमुख या दोन माजी आमदारांनाही बरोबर घेतले आहे. या दुष्काळी मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. मनमाड शहरात तर तो तीव्र आहे. पण धरणातून थेट जलवाहिनीद्वारे योजना राबवून कांदे यांनी मनमाडचा यक्ष पाणी प्रश्न सोडवून दाखवला आहे. ही त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पण भुजबळ यांनी हार मानलेली नाही. त्यांनी नांदगावमध्ये फिल्डिंग लावायली आहे. काहीही झाले तरी सुहास कांदेंना सुट्टी द्यायची नाही, त्यांना चेपवायचेच अशा आक्रमक मूडमध्ये भुजबळ आल्याचे दिसत आहे.