“संजय शिरसाटांनी संयम ठेऊनच बोललं पाहिजे”, ‘त्या’ वक्तव्यावर CM फडणवीसांचा मोलाचा सल्ला

Devendra Fadnavis : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. वसतिगृहासाठी कितीही निधी मागा. तत्काळ मंजूर करू. पैसा सरकारचा आहे आपल्या बापाचं काय जातंय असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी अक्षरशः टीकेची झोड उठवली. राज्य सरकारही बॅकफूटवर गेले. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांची पाठराखण करत त्यांना मोलाचा सल्ला दिला. संजय शिरसाट जे काही बोलले त्याचं इंटेशन मला चुकीचं वाटत नाही. तरीदेखील त्यांनी थोडं संयमानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं, असे फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावतीत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मला असं वाटतं की मंत्री एखाद्या भाषणात एखादी गोष्ट कधीकधी गमतीनेही बोलतात. आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही. माध्यमांना माझी विनंती आहे की काही वक्तव्ये खरंच गंभीर असतात चुकीची असतात.
पण आता संजय शिरसाट (Sanjay Shirsat) जे काही बोलले त्याचं इंटेन्शन मला काही चुकीचं वाटत नाही. तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी थोडं संयम ठेऊनच बोललं पाहिजे. मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितलं की मी जे काही बोलले त्यातील अर्धवट माहिती दाखवली जात आहे. या प्रकरणात सर्व माहिती त्या मला देणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय शिरसाट?
सामाजिक आणि न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी भाषणामध्ये बोलताना त्यांनी एक विधान केले. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे. आपल्या बापाचं काय जातंय? हे वक्तव्य त्यांच्यासह शिवसेना आणि सरकारसाठी अडचणीचं ठरलं. विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या या भाषणाचे व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले; CM फडणवीस म्हणाले, ” आता आम्ही मंगळवारी एक..