मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…
Sujay Vikhe Patil Nomination filed : आज अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रचार सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीचे इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी, बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच, विखे कुटुंबाची मुळं इतकी खोलवर आहेत की, इंडिया आघाडीचं कुणीही आलं तरी ते उखडू शकत नाहीत (Ahmednagar Lok Sabha) अशा शब्दांत विखे पाटील कुटुंबाची मोठी स्तुतीही केली आहे.
सर्व मतदार विखे यांच्या पाठिशी उभे राहतील
अहमदनगर जिल्ह्यातच नाही तर देशभरात पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराचं बीज पेरलं आहे. त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचं वटवृक्ष केला. आज देशभरात विखे पाटील यांची यावरून मोठी ख्याती आहे. हीच परंपरा आता सुजय विखे पाटील चालवत आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे कुटुंबाची स्तुती केली. तसंच, मतदारसंघातील सर्व प्रश्न सुजय विखे पाटील संसदेत मांडतात. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदार विखे यांच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
इंजिनमध्ये बसण्यासाठी माणसांना डब्बेच नाहीत
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. मोदींची गॅरंटी सोडली तर बाकी सर्वांची गॅरंटी फेल झाली आहे. मोदींच्या इंजिनला डब्बेच डब्बे आहेत तर इंडिया आघाडीची अवस्था अशी आहे की, त्यांच्या इंजिनमध्ये बसण्यासाठी माणसांना डब्बेच नाहीत अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर आपल्याला पुन्हा एकदा सुजय विखे यांना दिल्लीला पाठवायचं आहे. त्यामुळे महायुतीला मत द्या असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.