“मिस्टर बिनने बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती”, शिंदेंनीही ठाकरेंना सुनावलंच…

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray : विधिमंडळातील चर्चेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. शिवसैनिकांनी कामराच्या स्टुडिओची केलेली तोडफोड यावरुन विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली होती. या सर्व घडामोडींवर आज एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मिस्टर बिन म्हणून केला. काही लोक मिस्टर बिन आहेत. मिस्टर बिनने बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले, मिस्टर बिन आहेत ना, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची जी वृत्ती आहे त्यामुळेच सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी निर्माण झाली त्याचा हायहोल्टेज शॉक बसला. त्यातून अजून काही लोक सावरलेले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डस्टबिनमध्ये कोण बसलं होतं ते कुणी पाहिलं नाही. पण बाहेर आल्यावर कुणाला घाम फुटला कोण तीन ग्लास पाणी प्यायलं. चहा मागवा म्हणून सांगितलं, चहा कोणता होता वाघबकरी चहा ते पण आम्ही पाहिलं. मला जास्त बोलायचं नाही आणि बोलायला लावूही नका. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी.. असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
कुणाल कामराच्या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले?, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर
बाळासाहेब शिवसैनिकांच्या कायम पाठीशी उभे राहिले म्हणून शिवसेना मोठी झाली. आता अडीच वर्षे झाली आहेत कोण खरं कोण खोटं आहे हे देखील लोकांना समजलं आहे अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.
मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण झाली तेव्हा तुमच्या हातातलं संविधान कुठे होतं? प्रदीप मोरेला मारलं तेव्हा संविधान कुठं होतं? केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा संविधान कुठं होतं? आरजे मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली तेव्हा संविधान कुठं होतं? फक्त हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडलं तेव्हा कुठं होतं संविधान? खोट्या केस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचलं तेव्हा संविधान कुठं होतं? असे सवाल एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विचारले.
चोर आणि गद्दार एकनाथ शिंदे..कुणाल कामरा यांनी का माफी मागावी? आदित्य ठाकरे यांचा सवाल