माजी आयपीएस शिवदीप लांडे आता राजकारण गाजविणार; बिहारमध्ये ‘हिंद सेना’ पक्षाची स्थापना

माजी आयपीएस शिवदीप लांडे आता राजकारण गाजविणार; बिहारमध्ये ‘हिंद सेना’ पक्षाची स्थापना

Shivdeep Lande : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले असून बिहारमधील सत्ताधारी जेडीयू (JDU) – भाजप (BJP) यांच्यासह आरजेडी (RJD) आणि काँग्रेसने (Congress) देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून ‘पलायन रोको’ यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे तर दुसरीकडे आता बिहारच्या राजकारणात बिहारचे सुपर कॉप म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे (EX IPS Shivdeep Lande) यांची देखील एंट्री झाली आहे. होय, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मलेले शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश करत नवीन राजकीय पक्ष ‘हिंद सेना’ (Hindu Sena Party) स्थापन करण्याची घोषणा केली. शिवदीप लांडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

पाटण्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शिवदीप लांडे यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितले. 18 वर्षे बिहारच्या गणवेशात सेवा केल्यानंतर, मला आता एका नवीन भूमिकेत लोकांसमोर यायचे आहे. हिंद सेना पक्ष बिहारला परिवर्तन करण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काम करेल. पक्षाचे निवडणूक चिन्ह खाकी रंगाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुंड असेल अशी माहिती त्यांनी दिली.

ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सुपर कॉप माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नवीन पक्षाची संपूर्ण देशात चर्चा होत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शिवदीप लांडे बिहारच्या अनेक जिल्ह्यात  ‘रन फॉर सेल्फ’ या बॅनरखाली काम करत आहे. आयपीएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहार बदलण्याच्या उद्देशाने काम करणार आणि मी खाकी गणवेश सोडला आहे पण आतून खाकीमध्येच आहे. आता आपल्याला फक्त बिहार बदलण्यासाठी काम करायचे आहे असं शिवदीप लांडे म्हणाले होते.

“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

कोण आहे शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिला होता. त्यानंतर ते लवकरच राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात जोराने सुरु होती. लांडे बिहारमध्ये ‘सिंघम’ आणि ‘सुपरकॉप’ अशा नावांनी ओळखले जातात. पाटणा, पूर्णिया, अररिया आणि मुंगेर सारख्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली होती. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मलेले लांडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नागरी सेवेत दाखल झाले. बिहारमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यात होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube