यारी असावी तर रणजितदादा अन जयाभाऊंसारखी…

यारी असावी तर रणजितदादा अन जयाभाऊंसारखी…

पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला होता. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संकट काळात आमदार गोरेंनी पहिला फोन लावला तो आपल्या जिगरी मित्राला म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना. हे समजतात नाईक निंबाळकर घटनास्थळी पोहोचले आणि गोरे व त्यांच्या सहकार्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

गोरे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र नाईक निंबाळकर हे गोरे यांच्या सोबत सावलीप्रमाणे दिसत असून त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून दवाखान्यात ठाण मांडून आहेत. आमदार गोरे आणि खासदार नाईक निंबाळकरांनी निभावलेल्या मैत्रीवरून नेटकऱ्याकडून देखील कौतुक केलं जात आहे. यारी असावी तर अशी रणजितदादा अन जया भाऊंसारखी,अशा शब्दात एका नेटकऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेटकरी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाला की, जिगरी यारी…एकाने दुसऱ्याला खासदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला तर दुसऱ्याने रात्री अपघातात पळापळ करून मित्रास जिवदान मिळण्याकरीता सिंहाचा वाटा उचलला…यारी असावी तर अशी..जिवाला जीव देणारी..हा फोटो खूप काही सांगून जातो..अशी दोस्ती असेल तर दुनियेने कितीही कटकारस्थाने केली तरी लढायला धमक अन् मनगटात बळ यायला वेळ लागत नसतो..आणि कदाचित याच दोस्तीमुळे एकजण आमदार व एकजण खासदार आहे व जयाभाऊ अशा गंभीर प्रसंगातूनही सुखरूप आहेत..जयाभाऊ रणजितदादा..लय भारी, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

दरम्यान, निंबाळकर आणि गोरे यांची मैत्री २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याला कळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माढा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र पवारांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला गेला आणि पर्यायाने राष्ट्रवादीचे संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले होते. यामुळे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात ही लढत होणार होती. राष्ट्रवादी-काँग्रेसची युती असल्याने काँग्रेस मित्रपक्षाला मदत करणार असे अपेक्षित होते.

मात्र झालं उलटंच माण-खटावचे तत्कालीन काँग्रेस नेते जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षाला मदत करणार नसून मित्र नाईक निंबाळकर यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे आमदार असताना उघडपणे भाजपचा उमेदवार असलेल्या निंबाळकरांचा प्रचार सुरु केला. इतकेच नाही तर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करत आपण आपल्या मित्रासाठी राष्ट्रवादीला या निवडणुकीत मदत करणार नसल्याचे त्यांनी व्यासपीठावरूनचं जाहीर केले होते.

रणजितसिंह हा माझा घरातील उमेदवार आहे. घरातील आणि पक्षातील कुणीही जेव्हा माझ्यासोबत नव्हता. तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे. त्यामुळे सगळा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असे कार्यकर्त्यांना सांगितले. रणजितसिंहचे वडील हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार होते त्यावेळी त्यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता वेळ आली आहे की, आपण देखील त्यांना मदत करायची आहे.

आपल्या मातीला ज्यांनी पाणी पाजण्यासाठी कष्ट केलं त्यांचा हा पुत्र आहे. माझा मित्र नंतर आहे, असे सांगत गोरेंनी निंबाळकरांना व्यासपीठावर बोलावून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. या मेळाव्यानंतरच माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे चित्र बदललं आणि नाईक निंबाळकर खासदार म्हणून विजयी झाले. पुढे आमदार गोरेही भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडून आले. या निवडणुकीपासून गोरे आणि रणजितसिंह यांची ‘जिगरी यारी’ जी आधी माढा लोकसभा मतदारसंघात माहित होती ती संपूर्ण राज्याला कळाली. त्याचाच प्रत्यय गोरे यांच्या अपघातामुळे पुन्हा एकदा राज्याला बघायला मिळाला.

निंबाळकरांच्या मैत्रीसाठी पक्ष आणि राजकीय करिअर पणाला लावणाऱ्या गोरेंची मैत्री तर राज्याने पाहिली. आपला मित्र संकटात आहे हे समजताच वेळ- काळ न पाहता धावून जाणारे आणि या संकट काळात मित्रासोबत सावलीप्रमाणे राहणारे निंबाळकर यांची मैत्री देखील संपूर्ण राज्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गोरे यांच्या गाडीचा फलटण जवळ अपघात झाला होता. त्यांची गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली. त्यावेळी अंधारात नेमकं ठिकाण समजत नव्हतं. स्वीय सहाय्यक आणि चालक गंभीर जखमी होते.

गोरे यांनी अपघातानंतर पहिला फोन आपल्या मित्राला म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केला. ‘माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही.’ असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ५ ते ६ मिनिटांत निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना दवाखान्यात दाखल केलं होतं त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल येथे गोरे हे उपचार घेत आहेत. दरम्यान खासदार नाईक निंबाळकर त्यांची काळजी घेताना दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube