तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी! विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

मुंढे यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा केले असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनीं विधानसभेत केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 40

Jitendra Awhad’s sensational claim : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यातील भेसळ आणि बनावट औषधांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. मात्र, आता मुंढे यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा केले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार याणी जितेंद्र आव्हाड यांनीं विधानसभेत केला आहे.

विधानसभेच्या सभागृहात बोलताना आव्हाड यांनी दावा केला की, ड्रग्ज लॉबी, औषध उत्पादक कंपन्या आणि काही प्रभावशाली घटक एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. मुंढे यांची बदली व्हावी यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील आठवड्यात प्रकरणातील संबंधितांची नावे आणि पुरावे सार्वजनिक करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

एफडीए विभागाकडे सरकारने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप करताना आव्हाड म्हणाले की, भेसळीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. तपासणीसाठी पाठवल्या जाणाऱ्या नमुन्यांच्या चाचणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा आणि यंत्रणांची कमतरता असल्याने कारवाई प्रभावीपणे होत नाही. यावेळी त्यांनी विभागातील काही अधिकाऱ्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालघरमध्ये गुटखा उतरतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचतो तरी तो रोखला का जात नाही? असा सवाल करत अधिकाऱ्यांची देखील स्वतंत्र लॉबी कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. नमुने प्रयोगशाळेत गेल्यानंतर फेल होतात, पण नंतर सेटलमेंट केली जाते, असा गंभीर दावा देखील त्यांनी सभागृहात केला.

Vikram Pachpute : बनावट पनीरवर बंदी घाला; आमदार पाचपुतेंनी मंत्री झिरवळांकडे मागणी…

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, ते साधे आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. मात्र त्यांच्यावर प्रचंड दबाव असून त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ देखील येऊ शकते. राज्यातील तांदूळ, मावा आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सक्षम अधिकारी आवशयक असून तुकाराम मुंढे हे ते काम प्रभावीपणे करत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या सर्व आरोपांवर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. एफडीएकडून सध्या प्रभावी कारवाया सुरू असून विभागाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी मान्य केले. अधिकाऱ्यांकडे वाहने आणि कार्यालयीन सुविधा नसल्याने आवशयक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना किमान तीन वर्षे या पदावर कायम ठेवावे, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यातील टी आता टायगरमधील टी झाला आहे, असे म्हणत त्यांनी मुंढेंना पाठिंबा दर्शवला आहे. तर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आणखी गंभीर मुद्दा उपस्थित केला. तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. त्यामुळे एफडीएतील कारवाया, भेसळविरोसधी मोहीम आणि मुंढे यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

follow us