येरावार यांची आमदारकी संकटात… पवारांचा ‘पठ्ठ्या’ छातीला माती लावून मैदानात

येरावार यांची आमदारकी संकटात… पवारांचा ‘पठ्ठ्या’ छातीला माती लावून मैदानात

2014 मध्ये 1200 मतांनी विजय. 2019 मध्ये 2200 मतांनी विजय. माजी मंत्री आणि भाजप नेते मदन येरावार यांचे यवतमाळमधील गत दोन निवडणुकांमधील हे मताधिक्य. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप (BJP) आणि महायुतीला विधानसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. अशावेळी येरावार यांच्या या अगदी काठावरील आकड्यांनी भाजपची धास्ती वाढवली आहे. यवतमाळ मतदारसंघ जिंकणे हे यवतमाळकरांचे हृदय जिंकण्यासारखे आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातही या मतदारसंघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशावेळी यंदा या मतदारसंघात भाजप मदन येरावार यांच्याच उमेदवारीची रिस्क घेणार? की दुसऱ्या शिलेदाराला तिकीट देणार? महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटू शकतो? आणि कोण उमेदवार असू शकतो? (Madan Yerawar vs Sandeep Bajoria of Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar) from Yavatmal Assembly Constituency)

याच सगळ्या लेट्सअप मराठीने घेतलेला ग्राऊंड झिरो आढावा…

यवतमाळ म्हंटलं की पहिले नाव आठवते ते विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवाहरलाल दर्डाचा पराभव करत धोटेंनी राजकीय पटावर एन्ट्री घेतली. पुढे याच मतदारसंघाचे धोटे पहिले आमदार म्हणून निवडून आले. 1962 साली धोटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. त्यानंतर वेगळ्या विदर्भ आंदोलनाच्या जोरावर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. 1967 साली पुन्हा अपक्ष राहून जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळला. 1971 साली धोटे नागपूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1972 साली फॉरवर्ड ब्लॉककडून के. एन. घारफळकर हे निवडून आले.

तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्याच जिल्ह्यातील जागा धोटेंमुळे जिंकता येत नव्हती. 1978 मध्ये पुन्हा जांबुवंतराव धोटे यांनीच बाजी मारली. पुढे धोटे काँग्रेस पक्षासोबत आले. नागपूरमधून लोकसभेवर निवडूनही गेले. इकडे यवतमाळमध्येही 1980 साली आबासाहेब पारवेकर यांनी काँग्रेसकडून पहिल्यांदा विजय मिळवला. 1985 सालीही काँग्रेसचे सदाशिवराव ठाकरे या मतदारसंघातून जिंकून आले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला तगडा असा विरोधकच नव्हता. 1990 साली जनता दलाचे अण्णासाहेब देशमुख आमदार झाले. त्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयाताई धोटे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Ground Zero : लोकसभेला शॉक; आता बावनकुळेंना विधानसभाही जड जाणार?

1995 साली यवतमाळमध्ये पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले. राजाभाऊ ठाकरे यांना यवतमाळच्या मतदारांनी निवडून दिले. 1999 साली काँग्रेसचे किर्ती गांधी आमदार झाले. यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक राहिलेल्या मदन येरावार यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला. 2004 मध्ये मदन येरावार या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. 2009 मध्ये काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचे मैदान मारले. पण जानेवारी 2013 मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला. त्या यवतमाळ विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार झाल्या.

2013 चे वर्ष संपता संपता देशासह महाराष्ट्र आणि विदर्भातील संपूर्ण राजकीय वातावरणच बदलल होते. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने शिवसेनेला डच्चू दिला. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडीतही बिघाडी झाली होती. त्यावेळी भाजपने पुन्हा येरावार यांच्यावरच विश्वास दाखवला. तर शिवसेनेकडून संतोष ढवळे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे मैदानात होते. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तत्कालिन आमदार संदीप बाजोरिया यांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी ढवळे यांच्या पाठीमागे एक गरीब उमेदवार म्हणून सहानुभूतीची लाट होती. मतदारांनी ढवळेंना भरभरुन मतदान केले.

पण अटीतटीच्या लढतीत मदन येरावार यांनी अवघ्या एक हजार 227 मतांनी बाजी मारली. राहुल ठाकरे यांना 33 हजार 152 मते मिळाली. बसपाच्या तारीक लोखंडवाला यांना 34 हजार 498 मते मिळाली होती. तर संदीप बाजोरिया यांना 17 हजार 990 मते मिळाली. पुढे येरावार फडणवीस सरकारध्ये मंत्रीही झाले. 2019 मध्ये काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांना तिकीट दिले. भाजकडून येरावार यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. मांगुळकर यांनी येरावार यांना जोरदार लढत दिली. आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरिया यांनी मांगुळकर यांच्यामागे सर्व ताकद उभी केली. आवश्यक ती रसदही पुरवली. पण येरावार यांनी अवघ्या 2200 मतांनी बाजी मारली.

गत पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहुन गेलं आहे. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संजय देशमुख यांनी विजय मिळवला आहे. यात त्यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातूनही दोन हजार मतांची आघाडी आहे. संतोष ढवळे यांनी मागच्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचे काम चालू ठेवले आहे. ते सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आहेत. शिवाय काँग्रेसने गत दोन निवडणुकीत ही जागा गमावली आहे. त्यामुळे यंदा ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुटून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी ढवळे यांना अपेक्षा आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांना आपल्यालाच तिकीट मिळेल असा विश्वास आहे.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला माजी आमदार संदीप बाजोरिया यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तयारीला सुरुवात केली आहे. यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्याची वाट लावणाऱ्या मदन येरावार यंदा आमदार हेणार नाही, अशी शपथ घेत त्यांनी स्वतःची उमेदवारीही जाहीर केली आहे. नुसती उमेदवारी जाहीर करुन ते शांत बसलेले नाहीत. त्यांनी धडाक्यात प्रचारही सुरु केला आहे. शहरात अस्वच्छतेचा मुद्दा फोकस करुन त्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. नित्यनियमाने स्वखर्चाने 43 ट्रॅक्टर लावत ते संपूर्ण शहरातील कचरा उचलत आहेत.

Ground Zero : यशोमतीताईंना पाडण्याचा राणांचा विडा; वानखडेंना ताकद देणार?

मतदारसंघात मेडिकल कॅम्प, विविध आंदोलने या माध्यमातून संपूर्ण शहरात वातावरण निर्मिती केली आहे. अमृत योजना पूर्णत्वास नेणे, रस्ते डांबरीकरण, क्रीडांगण, आरोग्य व्यवस्था, नाट्यगृह उभारणी, शहर स्वच्छता, गुन्हेगारी मुक्त यवतमाळ अशा 23 कलमी कार्यक्रमांची घोषणा करत जाहीरनामा तयार केला आहे. बाजोरिया 2010 ते 2016 पर्यंत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार होते.  त्यांच्याच काळात यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती झाले होते. पुसदपलिकडे राष्ट्रवादी घेऊन जाण्यासाठी बाजोरिया यांनी प्रयत्न केला होता. आजही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थावर संदीप बाजोरिया यांचा चांगला होल्ड आहे.

मतदारसंघातील 48 गावे बाजोरियांसाठी हक्काची गावे समजली जातात. इतर गावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी गावभेट दौरा सुरु केला आहे. यामध्यमातून ते जुन्या नेटवर्कला अॅक्टिव्ह करत आहेत. आर्थिक पातळीवरही संदीप बाजोरिया हे मजबूत समजले जातात. निवडून येण्याची क्षमता यावर महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित होणार आहे. त्यामुळेच  प्रचार, जनसंपर्क, आर्थिक ताकद अशा सर्वच पातळ्यांवर बाजोरिया यांनी स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजोरिया यांची शरद पवार यांच्यासोबतही चर्चा झाली आहे. पवारांनी त्यांना काम सुरु ठेवायला सांगितले आहे. जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कशी येईल यासाठीचे प्रयत्न करण्याची जबाबदारी पवारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

त्याचवेळी भाजपमध्येही सारे काही आलबेल आहे असे नाही. विद्यमान आमदार मदन येरावार यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचे दिसून येते. दहा वर्षांपासून तेच आमदार असल्याने त्यांच्याविरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांनीही आजी-माजी पालकमंत्र्यांकडून कमिशनखोरी होत असल्याचा आरोप करत मदन येरावार यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. अमृत योजनेत सुमार दर्जाची कामे झाल्याने अजूनही यवतमाळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच एक एक जागा महत्वाची असताना गत दोन्ही निवडणुकीतील येरावार यांचे मताधिक्य भाजपची धास्ती वाढवणारे आहे.

यातूनच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी आपल्या जुन्या समर्थकांना एकत्रित करुन प्रचार कार्यक्रम हाती घेतला आहे. दुसरीकडे भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे यांनीही या मतदारसंघात महिला उमेदवाराला संधी द्यावी, असे म्हणत आपले नाव पुढे केले आहे. अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्याही इच्छुकाचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे जागा भाजपला सुटेल हे तर निश्चित आहे. पण अनेक वर्षात या पहिल्यांदाच भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे नवख्या उमेदवाराला लॉटरी लागणार की येरावार यांचे वजन कायम राहणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube