“मतदानावर परिणाम होणारच, नवं चिन्ह बिंबवणं सोपं नाही”; भुजबळांनी खोडला रोहित पवारांचा दावा
Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आदेशाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकात हे नवे पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांचा पक्ष लोकांत जाणार आहे. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात नवीन चिन्ह लोकापर्यंत लवकर पोहोचेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मात्र विरोधी दावा केला आहे. नवीन चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणं सोपं नसतं. नव्या चिन्हामुळे मतदानावर थोडा फार परिणाम होणारच आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
भुजबळ म्हणाले, शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं. नव्या चिन्हामुळे मतदानावर थोडा फार परिणाम होणारच आहे. कारण नवं चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवायचं काम सोपं नसतं. आता सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. इलेक्ट्ऱॉनिक मीडियाही आहे. त्यामुळे चिन्ह दूरवर पोहोचू शकते. आधी अडचणी यायच्या. आताही थोड्याफार अडचणी येणारच आहेत.
Rohit Pawar : ठाकरेंची ‘मशाल’ अन् ‘तुतारी’ घेत लढायचं; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं
खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही गोष्टी पक्क्या असतात. शरद पवार म्हणजे घड्याळ, असे ग्रामीण भागातील लोकांना वाटते. त्यामुळे अडचणी येणारच आहेत. 1999 मध्येही असेच घडले होते. त्यावेळी 25 ते 30 टक्के मते काँग्रेसकडे गेली होती. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हाताचा पंजा होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह घड्याळ होतं. त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या बाहेर होतो. आम्ही लोकांना विचारायचो की कुणाला मत दिलं तर ते म्हणायचे आम्ही हाताचा पंजा म्हणजेच शरद पवारांना दिलं. आता मात्र फारशी अडचण येणार नाही असे भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले रोहित पवार ?
‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती.’
Chhagan Bhujbal : तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव; भुजबळांचं जरांगेंना आव्हान