धंगेकरांना उमेदवारी मिळताच वसंत मोरेंचं ठरलं; हाती ‘हातोडा’ घेऊन अपक्ष मैदानात उतरणार
पुणे : लोकसभासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर विरोधक म्हणून कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. त्यावर काल (दि.21) पडदा पडला असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देत मुरलीधर मोहोळांविरोधात (Murlidhar Mohol) मैदानात उतरवले आहे. मात्र, मनसेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून इच्छूक होते. पण, धंगेकरांना उमेदवारी देण्यात आल्याने मोरेंचा पत्ता कट झाला असून, मोरे मात्र खासदारकी लढवण्यावर ठाम आहेत. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे नव्या चिन्हाची मागाणीदेखील केल्याचे सांगितले जात आहे. मोरेंच्या या निर्णयामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. (Vasant More Maybe Independent candidate For Pune Loksabha )
अपक्ष म्हणून मैदानात उतरणार
मनसेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या वसंत मोरेंना पुण्यातून तिकीट दिले जाईल अशी दाट शक्यता होती. राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आपल्याला खासदारकी लढवण्याची इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवलली होती. एवढेच काय तर, मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटदेखील घेतली होती. पण गुरूवारी संध्याकाळी धंगेकरांचे नाव समोर आल्याने मोरेंच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, जरी धंगेकरांना पुण्यातून मविआने उमेदवारी दिल्यानंतरही मोरे पुण्यातू लोकसभा लढवण्यावर ठाम असून, उपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा चंग मोरेंनी बांधला आहे. यासाठी त्यांनी हालचाली करण्यास सुरूवात केली असून, निवडणूक आयोगाकडे यासाठी त्यांनी हातोडा चिन्हाची मागणी केली आहे.
Lok Sabha Election : बंगाल, बिहार, झारखंड अन् महाराष्ट्र, राजकीय वादाचा फायदा कुणाला ?
मोरेंचा हातोडा कुणावर पडणार?
मविआकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. तर, दुसरीकडे मोरे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यास मतं कमी होण्याचा हातोडा नेमका कोणत्या उमेदवारावर पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.