बाळासाहेबांनी संजय राऊतांना मुलाखतीतच दिल्या शिव्या! राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा
Raj Thackeray Sanjay Raut on Bodh Kirtan Book: खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला.
Raj Thackeray Sanjay Raut on Bodh Kirtan Book: शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक रंजक किस्साही सांगितला. संजय राऊत यांनी तुरुंगात असताना पुस्तक लिहिण्याचा अनुभव घेतला. मात्र, त्यांनी यापुढे अशी पुस्तके तुरुंगाच्या बाहेर राहून लिहावीत, असा मिश्किल टोलाही राज ठाकरेंनी लगावला. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?’ संजय राऊतांच्या वक्तव्याने ‘बोध कीर्तन’ची चर्चा
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठी भाषेच्या वापरावर भाष्य केले. ते म्हणाले, “अंबरिश मिश्रांनी (लेखक) मराठी कशी बोलली पाहिजे आणि कशी लिहिली पाहिजे, याचे क्लासेस घेतले पाहिजेत. सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्येही चांगले मराठी लिहिण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण द्यावे. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले आहेत. त्यासंदर्भात येणाऱ्या नोटिसा वाचल्यानंतर मला नेमकं धरलंय की सोडलंय, हेच कळत नाही. इतक्या विचित्र भाषेत त्या लिहिलेल्या असतात की, न्यायालयाला नेमकं काय म्हणायचं आहे, हे समजत नाही. मराठी भाषा अशा पद्धतीने लिहिली जाऊ नये,” असे ते म्हणाले.
चांगल्या मराठी लेखनासाठी उत्तम पुस्तके वाचण्याची गरज असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे कौतुक केले. उत्तम मराठी साहित्यामध्ये या पुस्तकाने भर घातली असून प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बाळासाहेबांच्या मुलाखतीचा रंजक किस्सा
यानंतर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबतच्या अनेक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “संजय राऊत आणि त्यांचे चित्रपटविषयक लेखन करणारे मित्र दिलीप ठाकूर माझ्या वडिलांकडे यायचे. तासनतास तिथे बसायचे. अनेकदा त्यांनी माझ्या वडिलांच्या शिव्याही खाल्ल्या आहेत. त्या काळात संजय राऊत ‘मार्मिक’साठी लिहायचे. नंतर राऊत ‘लोकप्रभा’मध्ये होते, आणि मी ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्र काढायचो. त्याचबरोबर ‘लोकसत्ता’साठीही फ्रीलान्स व्यंगचित्रकार म्हणून मी काम करत होतो.”
त्यावेळच्या पत्रकारितेतील वातावरणाची आठवण सांगताना त्यांनी राऊत यांच्या लेखनाचेही कौतुक केले. संजय राऊत गँगवॉरवरील बातम्या आणि लेख उत्तम लिहायचे. त्यानंतर ‘सामना’ सुरू झाला आणि आमची मैत्री आणखी घट्ट झाली. मात्र, त्यावेळी आमच्यात अनेकदा वादही व्हायचे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
संजय राऊत एकदा ‘सामना’च्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की, वृत्तपत्राची भाषा इतकी मुळमुळीत कशी असू शकते? संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असलेल्या वृत्तपत्राची भाषा अशी असावी का? असा सवाल ते करायचे, अशी आठवण राज यांनी सांगितली.
बाळासाहेबांनी मुलाखतीत राऊतांना दिल्या होत्या शिव्या!
संजय राऊत यांनी 1992 मध्ये शिवसेनेच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना राऊत फारसे आवडत नव्हते. अशा परिस्थितीत राऊत यांनी एकदा बाळासाहेबांची मुलाखत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर राज यांनी बाळासाहेबांना याबाबत विचारले असता, त्यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता.
विमल जाहिरात प्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंनी दिली महत्त्वाची माहिती
“मला त्याचं तोंडही बघायचं नाही,” असे बाळासाहेब म्हणाले होते. मात्र, नंतर त्यांनी मुलाखतीला परवानगी दिली. शिवसेना भवनात ही मुलाखत पार पडली. मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी बाळासाहेबांना काही वेडेवाकडे प्रश्न विचारले. त्यावर चालू मुलाखतीत बाळासाहेबांनी राऊतांना चांगल्याच शिव्या दिल्या. विशेष म्हणजे, मुलाखत प्रसिद्ध करताना राऊत यांनी बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्यांसह संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी प्रसिद्ध केली. कोणतीही काटछाट केली नाही. राऊत यांची हीच गोष्ट बाळासाहेबांना आवडली आणि त्यानंतर त्यांना ‘सामना’चे संपादक करण्यात आले, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.
‘अशी पुस्तके तुरुंगाच्या बाहेर राहून लिहा’
दरम्यान, राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकातील एका कवितेचाही उल्लेख केला. त्यांनी या पुस्तकातील कविता वाचून दाखवली आणि त्यावर भाष्य करताना, “2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे कॅम्पेन वर्णन करणारीच ही कविता आहे की काय, असे वाटते,” अशी मिश्किल टिप्पणी केली.
पावसाच्या खंडामुळं रब्बी हंगामाचं नियोजन रखडलं; 3 जिल्ह्यांत पेरणीचं आव्हान
संजय राऊत यांच्या या पुस्तकात तुरुंगात असतानाचे अनुभवही मांडण्यात आले आहेत. राऊत यांनी एकदा सांगितले होते की, अशा प्रकारचे पुस्तक तुरुंगात असतानाच लिहिले जाऊ शकते. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांना उद्देशून मिश्किल टिप्पणी केली. “संजय राऊत यांच्याकडून अशी अनेक पुस्तके लिहिली जावीत. मात्र, ती त्यांनी तुरुंगाच्या बाहेर राहून लिहावीत,” असे ते म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानाने कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.