अमोल कोल्हे यांच्यासाठी 3 M फॅक्टर ठरणार महत्वाचा!

  • Written By: Published:
अमोल कोल्हे यांच्यासाठी 3 M फॅक्टर ठरणार महत्वाचा!

Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. याशिवाय अजित पवार यांच्यासोबतचे अनेक संस्थांवर काम करणाऱ्या नेत्यांचेही पाठबळ त्यांच्या पाठीशी आहेत. आढळराव यांनी आतापर्यंत लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या. पण त्यातील एकाही निवडणुकीत इतके नेते त्यांच्या सोबतीला नव्हते.

दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे कट्टर राजकीय विरोधकच आज आढळरावांसाठी बलस्थान बनलेले आहेत. असे असताना कोल्हे  ही लढाई कशाच्या विश्वासावर लढणार, याचीच चर्चा आहे. यासाठी कोल्हे यांना 3 M चा आधार असणार आहे. हे थ्री एम कोणते, याचा शोध या निमित्ताने घेऊ.

माळी समाजाचा एकमेव उमेदवार

या पहिला एम म्हणजे माळी समाज. कोल्हे यांच्यासाठी ही महत्वाची बाब आहे. कोल्हे यांच्या पाठीशी २०१९ मध्ये हा समाज मोठ्या संख्येने उभा राहिला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजाचा एकतरी खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, अशी भावना या समाजात आहे. त्यासाठी सर्वपक्षीय माळी पुढारी हे कोल्हे यांच्यासाठी काम करत आहेत. त्यातील काही उघडपणे तर काही छुप्या पद्धतीने कार्यरत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात या समाजाच्या मतदारांची संख्या किती, यावर अनेकदा चर्चा घडत असते. त्याचा निश्चित आकडा कोणाकडेच नाही. पण ही संख्या अडीच ते तीन लाखाच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ही मोठी ताकद कोल्हे यांच्यासाठी आज एकगठ्ठा उपलब्ध आहे. संपूर्ण राज्यात कोल्हे यांच्या रूपाने या समाजाचा एकच उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही; पवारांना भेटताच मोहिते पाटलांचा एल्गार

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आढळराव यांचे एक विधान त्यांच्या अंगलट आले होते. कोल्हे हे मराठा नसून माळी आहेत, एवढेच ते बोलले होते. खरे तर ही वस्तुस्थिती होती. पण राजकीयदृष्ट्या या विधानाचा योग्य तो फायदा कोल्हे यांना झाला. आढळराव यांच्या या एकाच वाक्याची क्लिप फिरविण्यात आली. त्याचा फटका आढळराव यांना बसला. देशभरात मोदी लाट असताना आढळराव हे शिरूरमधून पराभूत झाले. आधीच्या निवडणुकीत सुमारे साडेतीन लाखांच्या फरकाने निवडून आलेल्या आढळरावांचा कोल्हेंनी सुमारे ६० हजार मतांनी पराभव केला. हडपसर, शिरूर, खेड आणि जुन्नर या चार विधानसभा मतदारसंघात या समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. त्यानुसाच कोल्हे यांना मते पडल्याचे नंतर स्पष्ट झाले.

संभाजी महाराज मालिकेचा प्रभाव

दुसरा एम म्हणजे मराठा समाज. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे राज्यात प्रसिद्ध झाले. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्यालाही निवडणुकीआधी मोठा प्रतिसाद मिळाला. कोल्हे यांनी हडपसर आणि भोसरी या दोन विधानसभा मतदारसंघात सलग काही दिवस या नाटकाचे प्रयोग मोफत ठेवले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील मालिका टिव्हीवर गाजत होती. त्यांच्या त्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठीच राष्ट्रवादीने तेव्हा त्यांना उमेदवारी दिली होती. या निर्णयाची कबुली अजित पवार यांनी जाहीरपणे दिली होती. त्यामुळे शिवप्रेमी सारे मतदार हे कोल्हे यांच्या प्रेमात आहेत. त्यात मराठा समाजाचीही संख्या भरपूर आहे. कोल्हे यांच्या या पार्श्वभूमीमुळे समाजनिहाय मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. त्याचा योग्य तो फायदा कोल्हे यांना होतो. कोल्हे यांना फोन केला तरी ते पलीकडून जय शिवराय असे बोलून संभाषणाला सुरवात करतात. ही छोटी गोष्टही अनेकांच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांचा चाहता श्रोतावर्ग आधीच तयार झाला आहे. मतांच्या बेरजेसाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतात.

मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक

कोल्हे यांच्यासाठी उपयुक्त ठरणारा तिसरा एम म्हणजे मुस्लिम समाज. कोल्हे यांनी आपल्या स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या मालिकेतील भूमिकेचा या ठिकाणी पुन्हा उल्लेख करावा लागेल. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे की स्वराज्यरक्षक, असा वाद मध्यंतरी झाला होता. पण या वादाच्या आधीच कोल्हे यांच्या मालिकेत स्वराज्यरक्षक अशीच प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची उभी केली होती. संभाजीराजेंना विरोध करणाऱ्या स्वधर्मातील व्यक्तींना यात लक्ष्य करण्यात आल्याचा आक्षेप तेव्हा घेण्यात आला होता. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले की मुस्लिम समाज नाराज होण्याचा धोका असतो. तो धोका कोल्हे यांनी शिताफीने टाळला होता. त्याचा उपयोग त्यांना लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. शिरूर मतदारसंघात सुमारे दहा टक्के मुस्लिम समाज आहे. हा घटक भाजपवर नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तो साहजिकच कोल्हे यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

अमोल कोल्हेंचा विजय सुकर; शिरुरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली!

अर्थात केवळ या थ्री एम मुद्यांभोवतीच ही निवडणूक लढविली जाणार आहे, असे अजिबातच नाही. पण कोल्हे यांना हे घटक साह्यभूत ठरू शकतात. आढळराव यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हे मोठे बलस्थान आहे. शहरी भागांत मोदींना मानणारा मोठा वर्ग आहे. आधी म्हटल्याप्रमाणे सारे स्थानिक बडे नेते हे त्यांच्यासोबत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात आहे. पवार साहेबांवर अन्याय झाला म्हणून पोटतिडकिने बोलणारे अनेकजण या मतदारसंघात भेटतील. अनेक प्रस्थापित नेते हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यांच्या विरोधातील फळी ही कोल्हे यांना उपयोगी पडू शकते. एकूणच कोल्हे यांच्यासमोर आव्हान मोठे आहे. शिवाजीराव आढळराव यांना २०१९ च्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांवर जोरदार प्रहार करतात. यातील कोणाची निवड मतदार करणार हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube