आजोबांचं मार्गदर्शन घ्या, दृष्टीकोन बदलला तर फरक पडेल; आमदार पाचपुतेंनी पवारांची दुखरी नस दाबली…

आजोबांचं मार्गदर्शन घ्या, दृष्टीकोन बदलला तर फरक पडेल, या शब्दांत जोरदार उत्तर देत आमदार विक्रम पाचपुतेंनी रोहित पवारांची दुखरी नस दाबलीयं.

Vikram Pachpute On Rohit Pawar

Vikram Pachpute On Rohit Pawar : आजोबांचं मार्गदर्शन घ्या, राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला तर फरक पडेल, या शब्दांत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी आमदार रोहित पवार यांची दुखरी नस दाबलीयं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) विविध आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या एक्सवरील पोस्टला आमदार विक्रम पाचपुते यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करीत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पुढे बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, केवळ 1200 मतांनी विजय मिळाल्याची वेदना अजूनही संपलेली दिसत नाही. पण वेदनेला अंत नसतो. असो. २०२९ मध्ये कदाचित ती वेदनाही संपेल. कितीही थयथयाट केला, तरी अशा प्रकारच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कुणी मोठं झालेलं नाही आणि भविष्यातही होऊ शकत नाही. त्यापेक्षा आपल्या आजोबांचं मार्गदर्शन घ्या; कदाचित त्यातून राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला, तर काही फरक पडू शकेल, असं आमदार विक्रम पाचपुते यांनीही एक्सवर पोस्टमध्ये म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मित्राचा प्रश्न मोदींना भेटल्यानंतर सुटला आहे. या घटनेचा संदर्भ एमपीएससी विरुद्धच्या आंदोलनाशी जोडत पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार यांनी म्हटले आहे की, १५ वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले, पोलीस आणि न्यायालयांच्या फेऱ्या मारल्या, तरीही न्याय न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्राने मोदींची भेट घेताच त्यांच्या जागेवर भाजप आमदाराने मारलेला ताबा लगेच सोडला.

१५-१५ वर्षे न्याय मिळत नसेल आणि मित्राला एका भेटीत न्याय मिळत असेल, तर या देशात सामान्य नागरिकांसाठी न्यायाचा मार्ग न्यायालय आहे की मैत्री? असा प्रश्न पडतो. एका भेटीत मोदींच्या मित्राला न्याय मिळतो, फडणवीस साहेबांचा केवळ मित्र आहे म्हणून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला MPSC अध्यक्षपदावरून हटवलं जात नाही. मग ‘मैत्री’ हाच भाजप राज्यात न्याय मिळण्यासाठीचा निकष असेल, तर भाजपने आता ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेखाली ‘ओळख असेल तरच न्याय’ अशी तळटीप द्यायला हरकत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. आमदार पवार यांच्या या पोस्टवर आमदार पाचपुते यांनीही एक्सवर पोस्ट लिहून उत्तर दिले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून आमदार पवार यांना उत्तर देण्यासाठी आमदार पाचपुते पुढे आल्याचे दिसून येते. एमपीएससी आंदोलनाच्या निमित्ताने यापूर्वीही पाचपुते यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

follow us