ठरलं! 26 तारखेला ‘तुतारी’ जोरात वाजणार; अजितदादा कार्यकर्त्यांसाठी करणार मनोमिलनाची घोषणा

अजित पवार 24 डिसेंबर रोजी या युतीसंदर्भात मुंबईत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे.

  • Written By: Published:
ठरलं! 26 तारखेला जोरात 'तुतारी' वाजणार; अजितदादा कार्यकर्त्यांसाठी करणार मनोमिलनाची घोषणा

Ajit Pawar On Alliance Of Both NCP Factions : गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. पण, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्याबाबत कोणतेच संकेत मिळत नव्हते. मात्र, आता खुद्द अजितदादांनीच (Ajit Pawar) पवारांसोबतच्या मनोमिलनाचा मुहूर्त काढला असून, येत्या 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत, कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे.

अजित पवार तयार असतील तर त्यांना अटीशिवाय मविआत घेऊ; अंकुश काकडेंनी स्पष्टच सांगितलं

26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील

कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, असे सांगून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी धीर धरावा असा आदेश दिला आहे. अजित पवार 24 डिसेंबर रोजी या युतीसंदर्भात मुंबईत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे. त्यामुळेच आता येत्या 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा झाल्यास राजकारणात नव्या नांदीला सुरुवात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजितदादांमुळे जगताप नाराज 

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत उत्सुकता असताना मात्र, शरद पवार (Sharad Pawar) गट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कमालीचे नाराज झाल्याचे पाहण्यास मिलत आहे. अजितदादांसोबत युतीमुळे जगतापांनी पदाचा राजीनामा देत पवारांना जय महाराष्ट्र केला आहे. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांच्याशी झाला आहे. तुपेंना 1 लाख 34 हजार 810 मतं मिळाली होती, तर प्रशांत जगताप यांना 1 लाख 27 हजार 688 मतं पडली होती. जेमतेम सात ते आठ हजार मतांच्या फरकाने जगतापांना पराभव स्वीकारावा लागला होता. Ajit Pawar On Alliance Of Both NCP Factions

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजीनामा देईन असा इशारा जगतापांनी दिला होता. आता प्रत्यक्ष बोलणी सुरु असल्याने विरोध करणाऱ्या जगतापांवर पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आल्याची चर्चा आहे. प्रशांत जगताप हे शरद पवारांना मानणाऱ्यामधील एक आहेत. मागे माध्यमांशी याच विषयावर बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते.

पुण्यातील राजकीय घडामोडींकडं महाराष्ट्राचं लक्ष, अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार?

माझ्याकडे राजीनामा आलेला नाही – सुळे

प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जगताप यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती दिलेली नाही. कुणाशी आघाडी करायची याच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असल्याने जगताप नाराज आहेत का याबाबत मला माहिती नाही. पक्ष आघाडीबाबत जो काही निर्णय घेईल, तो सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल. नेत्यांनी विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

follow us