ताई माझी औकातच काढली ओ! भरणेंनी धमकावलेला कार्यकर्ता धाय मोकलून रडला…
Baramati Loksabha : तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) मतदानाची प्रक्रिया सुरु असून बारामती लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळचे आमदार दत्ता भरणे (Datta Bharane) यांनी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) कार्यकर्त्याला गावात जाऊन धमकी दिलीयं. या प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) तत्काळ इंदापुरातील दाखल होत त्यांनी कार्यकर्त्याची भेट घेतलीयं. यावेळी संबंधित कार्यकर्त्यांने सुप्रियाताईंजवळ धाय मोकलून रडत घडलेली आपबितीच सांगितलीयं.
मोठी बातमी : मतदानाच्या धामधुमीत काटेवाडीत पॉलिटिकल ड्रामा; सुप्रिया सुळे अजितदादांच्या भेटीला
नेमकं काय घडलं?
नाना गवळी असं धमकी दिलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. इंदापुरात शरद पवार गटाच्या बूथवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याचवेळी नाना गवळी थोड्या वेळासाठी बाजूला गेले असता अजितदादा गटाचे आमदार दत्ता भरणे कारमधून उतरले आणि नाना गवळी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी धमकी देताना दत्ता भरणे यांनी तुला गावात रहायचं का? तुझी काय औकात आहे? रात्री 6 नंतर तुम्हाला कोणीच नाही मीच सर्वांना मदत करीत असतो…नीट झक मार तू तूझी या शब्दांत भरणे यांनी गवळी यांना शिवीगाळसह धमकी दिली असल्याचं नाना गवळींनी सुप्रिया सुळे यांना सांगितलं आहे.
सुप्रियाताईंना आपबिती सांगत असतानाच तुम्ही काही बोललात का? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांच्याकडून झाल्यानंतर त्यावर नाना गवळी म्हणाले, आम्ही काहीच बोललो नाही, आम्हाला रोहितदादांनी सूचना दिल्या होत्या की आपल्याकडे सत्ता नाही ते सत्तेचा दुरुपयोग करतील, अन्याय करतील, पण तुम्ही काहीही बोलू नका, त्यामुळे मी भरणेंच्या शिव्या ऐकून घेतल्या असल्याचं नाना गवळींनी सुप्रिया सुळेंना सांगितलं.
‘ताई माझी अर्थिक कुवत नाही, कोणाला चहा पाजू शकत नाही’
आम्ही दत्ता भरणे यांना शरद पवार, रोहितदादा आणि सुप्रियाताईंकडे पाहुन मतदान केलंय, आज तेच औकात विचारतात , ताई माझी अर्थिक कुवत नाही, मी कोणाला चहा पाजू शकत नाही, असं म्हणत नाना गवळी धाय मोकलून रडले.
भरणे बोलले असतील पण मी माफी मागते…
नाना गवळी यांनी घडलेली संपूर्ण आपबिती सुप्रिया सुळे यांना सांगितल्यानंतर तुम्ही धीर सोडू नका, धीर सोडू नका, दत्ता भरणे बोलले असतील पण मी तुमची माफी मागते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाना गवळींची समजूत काढली.
प्रत्येक मतासाठी 1 ते 2 हजार वाटले; वंचितचा दावा
अजित पवार गटाकडून इंदापुरात आदल्या रात्री एका मतासाठी 1 ते 2 हजार रुपये वाटले असल्याचा दावा वंचितचे तालुकाध्यक्ष मनोज साबळे यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकरल्याने आता ते धमक्या देऊन हाणामारी करत असल्याचा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.