“माझ्याशी गाठ करणं सोपं नाही” दत्ता मामांच्या दमदाटीचा व्हिडिओ रोहित पवारांकडून व्हायरल

“माझ्याशी गाठ करणं सोपं नाही” दत्ता मामांच्या दमदाटीचा व्हिडिओ रोहित पवारांकडून व्हायरल

Rohit Pawar vs Dattatray Bharane : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. या काळात मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था आहे. मतदान शांततेत सुरू आहे. दुसरीकडे मात्र राजकारणी मंडळीतील आरोप-प्रत्यारोपांचा ड्रामा सुरुच आहे. आताही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे आणि एका व्यक्तीत वाद होताना दिसत आहे. ही व्यक्ती शरद पवार गटाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओत आमदार भरणे त्या व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी भरणेंवर घणाघाती टीका केली आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?

आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओत आमदार दत्ता भरणे आणि एका व्यक्तीत काहीतरी वाद सुरू आहे. भरणे हे त्या व्यक्तीशी भांडत आहेत. त्या व्यक्तीला शिवीगळही केली जात आहे. तु्म्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. मलाच तुमच्या मदतीसाठी यावं लागतं असे म्हणताना भरणे दिसत आहेत. यावेळी आजूबाजूला नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

‘बारामती’त पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप 

काय म्हणाले रोहित पवार ?

हा व्हिडिओ पोस्ट करत त्यातील कॅप्शनमध्ये रोहित पवार म्हणतात, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापुरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा.. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी आहेत.. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही!

यानंतर दत्ता भरणे यांनीही प्रतिक्रिया दिली. दोघांमधले भांडण सोडवत होतो. यावर पुन्हा रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. व्हिडिओ पाहून तर ते भांडण सोडवत होते असं वाटत नाही. समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत. अशा पद्धतीने कोण भांडणं सोडवतं असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती कळू शकलेली नाही. त्यामुळे या व्हिडिओतील सत्यतेची पुष्टी लेट्सअप मराठी करत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube