पुणे भाजपात वाद उफाळला ! सचिन दोडकेंमुळे आमदार तापकीर अन् खासदार मोहोळ यांच्यात शाब्दिक चकमक
आमदार भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या प्रवेशाला ठाम विरोध दर्शविला आहेत. मोहोळ हे सचिन दोडके यांच्या प्रवेशाच्या बाजूने.
पुणे : पुणे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या प्रवेशावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि खडकवासल्याचे आमदार भिमराव तापकीर ( MLA Bhimrao Tapkir) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. या निमित्ताने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं; अधिवेशनातील चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
या वादाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे वारजे येथील माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा असल्याची सूत्राची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन दोडके यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये आमदार भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या प्रवेशाला ठाम विरोध दर्शविला. तापकीरांनी बैठकीत स्पष्टपणे म्हटले की, सचिन दोडके यांनी 2019 आणि 2024 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतः त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली असून, अशा नेत्याला भाजपमध्ये घेणे योग्य नाही. (Controversy erupts in Pune BJP! Verbal clash between MLA Bhimrao Tapkir and MP Murlidhar Mohol over Sachin Dodke)
तापकीर यांच्या विरोधावर खासदार मोहोळ यांनी दोडके यांच्या प्रवेशाचे समर्थन केल्याचे समजते. वारजे परिसरात दोडके यांचा स्थानिक प्रभाव आणि पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान उपयुक्त ठरेल, असे मोहोळ यांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वातावरण चांगलेच तापले.
जैन मुनींचा उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल; ठाकरे गटाच्या नेत्याकडून जैन मुनींना प्रत्युत्तर
या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या वादामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली आहे. भविष्यात पक्षवाढीसाठी नवीन चेहरे सामील करण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. या वादानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात आणि सचिन दोडके यांच्या प्रवेशाबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सचिन दोडके यांनी आमदार तापकीर यांच्या विरोधात 2019 आणि 2024 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये तापकीर यांनी त्यांचा पराभव केला होता.
एकूणच आमदार तापकीर यांच वय पाहता खडकवासल्यासाठी नवीन चेहऱ्याची आवश्यकता पक्षाला पडणार आहे. पालिकेच्या निमित्ताने पक्ष नेतृत्व चाचपणी करून पाहत असल्याची पुरती कल्पना तापकीरांना आहे. शिवाय गेली अनेक वर्षे ज्यांच्यासोबत राजकीय संघर्ष केला त्यांना पक्षात घेतल्याने तापकिरांची कोंडीही होणार हे उघड आहे. त्यामुळे आता भाजपश्रेष्ठी दोडकेंच्या पक्षप्रवेशाबाबत काय निर्णय घेणारा हा पेच शहर भाजपसमोर आहे.
