एमपीएससी आंदोलनाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, पत्रकारांचा आंदोलनावर बहिष्कार
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असेलल्या या आंदोलनादरम्यान पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.
Journalist assaulted while out for news coverage : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लालबहादूर शास्त्री रस्त्यावर गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असेलल्या या आंदोलनादरम्यान पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी विविध माध्यमांचे पत्रकार घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी काही आंदोलक विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत तुम्हाला कोणी बोलावले आहे? तुम्ही इथून निघून जा असे म्हणत वाद घातला.
त्यानंतर वाद वाढत गेला आणि शिवीगाळ करत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन आंदोलनस्थळापासून दूर नेण्यात आले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
पुण्यातील आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू
या घटनेमुळे उपस्थित पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांशी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याच्या निषेधार्थ विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी आंदोलनावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी आंदोलनस्थळ सोडले. पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रिया, परीक्षा आणि नियुक्तीशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. मात्र, आंदोलनाच्या मूळ मुद्द्यांपेक्षा पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाची आणि मारहाणीची घटना अधिक चर्चेत आली आहे.
इजिप्तमधून कांदा आयात सुरूच राहिल्यास रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा
या प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी सुरू असून, नेमकी घटना कशी घडली, मारहाण करणारी व्यक्ती कोण होती आणि तिच्यावर कोणती कारवाई केली जाणार याबाबत माहिती घेतली जात आहे. आंदोलनादरम्यान पत्रकारांवर हात उचलल्याच्या या घटनेमुळे राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.