गुरुजी तालिम टायटन्स, रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स विजयी; पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप’ क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

गुरुजी तालिम टायटन्स, रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स विजयी; पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप’ क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Pune News : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या दिवसाचे मानकरी ठरले.

पुण्यातील सहकारनगर येथे शिंदे हायस्कूल मैदानावर या क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. पुणे पोलीस दलाचे पोलीस आयु्क्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्यासह पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदी उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित ही ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धा ही केवळ स्पर्धा नाही तर एक क्रिकेट महोत्सवच आहे. या महोत्सवामध्ये पुण्यातील विविध गणेश मंडळ, नवरात्र मंडळ तसेच ढोल-ताशा पथक आणि मीडिया अशा सर्वच क्षेत्रातील नागरिक एकत्र येत आहेत आणि मैत्रीचे नवे नाते निर्माण करत आहेत. पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिस नेहमीच कर्तव्यदक्ष राहणार आहे. शहरातील नागरिकांनी देखील सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा मंगळवारपासून थरार !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी केले. पुण्यातील गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये मंडळामध्ये काम करणार्‍या अध्यक्ष, पदाधिकार्‍यांपासून कार्यकर्त्यांना एकमेकांशी निवांत बोलण्यासाठी दोन मिनिटेसुद्धा नसतात. त्यांच्या अथक परिश्रमातून पुण्यातील उत्सव निर्विघ्नपणे पार पडत असतात. अशा या माझ्या मित्रांसाठी या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेद्वारे या सर्व लोकांनी एकत्र येवून दोन क्षण मैत्रीचे अनुभवावे, हा आमचा मुख्य हेतू आहे. शिवाय या स्पर्धेच्या निमित्ताने शारिरीक स्वास्थ्य राखून निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली सर्वांनी अंगीकारावी, अशी आमची अपेक्षा आहे. या वर्षी आम्ही 16 निमंत्रित संघांना स्पर्धेत सहभागी केले होते पण पुढील वर्षी सहभागी संघांची संख्या वाढवून या स्पर्धेची व्याप्ती देखील वाढविण्याचा आमचा मानस असल्याचे पुनित बालन म्हणाले.

या स्पर्धेतील सामन्यात प्रदीप जोरी याच्या ४८ धावांच्या जोरावर गुरूजी तालिम टायटन्स् संघाने मंडई मास्टर्सचा ३५ धावांनी पराभव केला. दुसर्‍या सामन्यात कपिल राऊत याच्या नाबाद ५६ धावांमुळे दगडुशेठ वॉरीयर्स संघाने श्रीराम पथक संघाचा ५ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. निखील वाटणेच्या कामगिरीमुळे साई पॉवर हिटर्स संघाने मिडीया रायटर्स संघाचा ७ गडी राखून विजय मिळवून उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

रूपक तुबाजी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शिवमुद्रा ढोलताशा संघाने गरूड स्ट्रायकर्सचा ५९ धावांनी सहज पराभव केला. सामन्यामध्ये रूपक याने ३६ धावा करत गोलंदाजीमध्ये २ गडी बाद केले. सुजीत धुमाळ याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने नादब्रह्म ड्रमर्सचा ५ गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली.

काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार

सामन्यांचा संक्षिप्त निकालः

गटसाखळी फेरीः

गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात १ गडी बाद ९६ धावा (प्रदीप जोरी ४८, स्वराज पोकळे नाबाद ३०, ऋषीकेश जगदाळे १-२१) वि.वि. मंडई मास्टर्सः ८ षटकात ६ गडी बाद ६१ धावा (अर्थव घाटगे १७, ओंकार जोशी १५, भावेश रच्चा २-९, सुशिल फाले २-८); सामनावीरः प्रदीप जोरी;

दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ५ गडी बाद ८७ धावा (कपिल राऊत नाबाद ५६ (२७, ४ चौकार, ४ षटकार), अभिषेक घारमळकर १४, अभिजीत खटवाटे १-९) वि.वि. श्री राम पथकः ८ षटकात ५ गडी बाद ८२ धावा (ओंकार टोळे ३२, उमाकांत जोगळेकर २५, प्रविण धावळे २-२२); सामनावीरः कपिल राऊत;

मिडीया रायटर्सः ८ षटकात ५ गडी बाद ५२ धावा (धीरज ढगे १३, श्रीकृष्ण कोल्हे ११, हुमेद खान २-२, निखील वाटणे १-१८) पराभूत वि. साई पॉवर हिटर्सः ३.३ षटकात ३ गडी बाद ५४ धावा (सुमित वारवे नाबाद १९, संजय काळोखे नाबाद १६, गोपाळ गुरव २-१३); सामनावीरः निखील वाटणे;

शिवमुद्रा ढोलताशाः ८ षटकात २ गडी बाद ११२ धावा (रोहीत खिलारे ३२, रूपक तुबाजी ३६, तुषार आंबट नाबाद २४) वि.वि. गरूड स्ट्रायकर्सः ८ षटकात ८ गडी बाद ५३ धावा (वरद चिल्लई १२, कैलास कांबळे १०, तुशार आंबट २-५, रूपक तुबाजी २-१८, हृषीकेश मोकाशी २-१३); सामनावीरः रुपक तुबाजी;

नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटकात ५ गडी बाद ५२ धावा (पार्थ डी. नाबाद १८, अंकित डाबी १२, सुजीत धुमाळ २-७) पराभूत वि. रंगारी रॉयल्स्ः ६.५ षटकात ५ गडी बाद ५३ धावा (सुजीत धुमाळ १४, हरनीष दाणी १५, शुभम जैन ३-९); सामनावीरः सुजीत धुमाळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube