शिरुर मतदारसंघाच्या स्ट्राँगरुममधील डेटा सुरक्षित, चुकीची माहिती पसरवू नका : जिल्हाधिकारी दिवसे

शिरुर मतदारसंघाच्या स्ट्राँगरुममधील डेटा सुरक्षित, चुकीची माहिती पसरवू नका : जिल्हाधिकारी दिवसे

Shirur Lok Sabha Election : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकेल अशी चुकीची माहिती कुणीही पसरवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँगरुमच्या सीसीटीव्ही डिस्प्लेच्या अनुषंगाने माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली.

मतदानानंतर स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम आणताना त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात. त्यानंतर त्या स्ट्राँगरुममध्ये सीलबंद केल्या जात असतानाही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या प्रत्येक सीलींग प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. स्ट्राँगरुम सील करण्यापूर्वीच त्याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आलेली असते. त्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे होत असलेसले चित्रीकरण पाहण्याची व्यवस्था एका वेगळ्या खोलीत डिस्प्लेवर केलेली असते.

Shirur Lok Sabha : शिवाजीराव आढळराव की अमोल कोल्हे? विजयाचं गणित असं सुटणार…

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम साठवणूक केलेल्या स्ट्राँगरुमला आतील भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, दुसऱ्या भागात राज्य राखीव पोलीस बल आणि तिसऱ्या भागात राज्य पोलीस दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येते. तसेच याठिकाणी वॉच टॉवर व त्याअनुषंगिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. या संपूर्ण भागाचे चित्रीकरण केले जाते ते उमेदवारांच्या प्रतिनिधींना पाहण्याची व्यवस्था करण्यात येते.

शिरुर लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करुन रांजणगाव येथील गोदामात साठवणूक करण्यात आले आहे. मतदानापूर्वी दोन दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली होती. गोदामात साठवणूक केलेले ईव्हीएमचे चित्रीकरण बघण्यासाठी साठवणुकीपूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही संनियंत्रण कक्षातून चित्रीकरण पाहता येण्याबाबत सूचना देण्यात येतात.

सीसीटीव्ही चित्रीकरण पाहण्याकरिता उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना नेमणूक पत्र देऊन त्यांचे सुरक्षा पासेस निवडणूक कार्यालयातून तयार करुन घेण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुरुवातीस राजकीय पक्षांकडून प्रतिनिधी नेमण्यात आले नव्हते. आता उमेदवारांच्यावतीने प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत.

Shirur Loksabha : आढळरावांकडे पाच तगडे आमदार… कोल्हेंचे काय होणार?

सीसीटीव्ही डिस्प्ले देखील त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तांत्रिक कारणांमुळे डिस्प्ले बंद झाला असला तरी चित्रीकरण सुरू असते व संपूर्ण डेटा एकत्रित करण्याचे काम सुरू असते. हा डेटा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने मागणी केल्यास पाहण्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे काही माध्यमांमधून आलेल्या वृत्तांमध्ये तथ्य नाही. अशा प्रकारच्या बातम्या दिशाभूल करू शकतात अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पाऊस, वारा आदीमुळे तांत्रिक अडचणी येऊ शकतात. याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक कर्मचारी नेमले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेने नोंदविलेला सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवू नये, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज