पुणे-नगरला ‘अवकाळी’चा तडाखा; राजकीय सभांना बसला फटका
पुणे/अहमदनगर/जालना : कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसाने तापमानात अचानक घट झाली. उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण हा पाऊस फळबागांना मारक ठरला. विशेष म्हणजे, ऐन निवडणुकीच्या प्रचारात पावसाने एन्ट्री घेतली. सहाजिकच या पावसाचा फटका नेते मंडळी आणि उमेदवारांच्या प्रचाराला बसला. आज प्रचाराचा सुपर फ्रायडे पावसाच्या बॅटिंगने गाजला. आज पुण्यात दुपारी वडगाव शेरी येथे शरद पवारांची सभा होणार होती. संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा आहे. तसेच नगरमध्ये अजित पवार यांची सभा होती.
Weather Update : अवकाळीचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
अहमदनगर शहरात आज (शुक्रवार) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील सावेडी, भिंगारसह पारनेर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने आज दुपारी हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात 40 अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे.
शरद पवारांची पुण्यातील सभा रद्द
पुणे शहरात आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. कडाक्याच्या उन्हातून काही काळ का होईना सुटका झाली. आज दुपारी पुण्यातील वडगाव शेरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार होती. मात्र त्याधीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सभा आयोजकांना ही सभा रद्द करावी लागली.
Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल
जालन्यातील उद्धव ठाकरेंची सभा रद्द
मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. येथेही प्रचार सभांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. जालना येथे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, पावसाची परिस्थिती पाहता आयोजकांना ही सभा रद्द करावी लागली. जालना मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाने प्रचाराच्या तोफा थंडावल्या
आज नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर शहरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. अजित पवारांना या पावसातच सभा घ्यावी लागली. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पावसाने हजेरी लावली. एकूणच पावसाने एक दिवस का होईना पण निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा थंड केल्या.