…तर नथुरामलाही क्लिनचिट दिली असती, आ. सदा सरवणकर प्रकरणावरुन विश्वंभर चौधरींचा संताप

…तर नथुरामलाही क्लिनचिट दिली असती, आ. सदा सरवणकर प्रकरणावरुन विश्वंभर चौधरींचा संताप

मुंबई : मुंबईतील एका गणेशोत्सवादरम्यान गोळीबार केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर ठाकरे गटाने केला होता. यानंतर मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करुन सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांना क्लिनचिट दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या क्लिनचिटवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी टीका केली आहे. ‘महाराष्ट्र पोलीस गांधी हत्येच्या वेळी दिल्लीत असते तर त्यांनी नथुरामलाही क्लिनचिट दिली असती’, असे त्यांनी म्हटले आहे.

गोळीबार प्रकरण काय आहे?
मुंबईच्या प्रभादेवीत गणेशोत्सबादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या गोळीबारामागे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीसांकडून सुरु होता. काल पोलीसांनी आपला अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये आमदार सदा सरवणकर यांना क्लिनचिट दिली आहे. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला पण तो त्यांनी केला नसल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. पोलीसांच्या या भूमिकेवर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी टीका होत आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी पोलीसांना खडेबोल सुनावाले आहेत.

मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार

विश्वंभर चौधरी संतापले…
शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांना गोळीबार केल्याच्या आरोपातून महाराष्ट्र पोलीसांनी क्लिनचीट दिली आहे. यात विशेष काही नाही. क्लीनचिटा गठ्ठ्यानं पडल्यात. फक्त क्लीनचिटोत्सुकानं भाजपाचा भंडारा कपाळी लावलेला असला पाहिजे, अशी टीका विश्वंभर चौधरींनी भाजपवर केली आहे.

ते पुढं लिहितात, पिस्तूल सरवणकरांचंच होतं पण गोळी दुसर्‍याच कोणीतरी मारली असा शोध पोलिसांनी लावून दाखवला आहे. महाराष्ट्र पोलीस गांधी हत्त्येच्या वेळी दिल्लीत असते तर नथुरामही असाच क्लीनचिट घेऊन सुटला असता. पिस्तूल नथुरामचं होतं तरी चाप ओढणारा हात दुसर्‍याचाच होता हे पोलीसांनी क्लिनचीटमध्ये स्पष्ट लिहीलं असतं.

लोक पोलीसांना जुमानत नाहीत अशी बरेचदा तक्रार असते. त्यात लोकांचा उद्धटपणा जास्त जबाबदार की पोलीस दलाची कणाहीन प्रतिमा जास्त जबाबदार हा संशोधनाचा विषय आहे. एरवी पोलीस चौकीत सामान्य माणसाला दरडावून बोलणारा पीआय मंत्र्याच्या बंदोबस्तात असतांना लोकांना केविलवाणा वाटत असतो. सगळं तेज संपून जातं पुढाऱ्यांच्या समोर गेले की, अशी टीका केली आहे.

कायद्याचा धाक राहिला नाही असं आपण म्हणतो खरं पण कायदा ऑलरेडी कोणाच्या तरी धाकात जाऊन स्वत्व गमावून बसलेला असतो हे जास्त खरं असतं. अर्थात महाराष्ट्र पोलीस दलाचीही ‘ईडी’ झालेली आहे. हे तेच पोलीस दल आहे जिथं एकेकाळी जेएफ रिबेरो यांच्यासारखे निडर आणि पाठीचा कणा असलेले अधिकारी होते. रिबेरो हे नाव इथं प्रातिनिधिक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube