मत न देणाऱ्यांचा सूड नव्हे तर, कामंही करा; गाव स्वच्छतेचा कानमंत्र देत राज ठाकरेंची मोठी घोषणा
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम करा. गाव स्वच्छ ठेवा. गावातील वातावरण बदलून टाका. गावातील लोकांनी तुम्हाला मतदान केलं नसेल तर सूड घेऊ नका. त्यांचीही कामे करा. त्यांनाही नंतर वाटलं पाहिजे की तुम्हाला मत दिलं नाही ही चूकच झाली’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना खास कानमंत्र दिला.
पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मेळाव्यास उपस्थित युवा सरपंचांना राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. तसेच मनसेच्या ताब्यातील ग्रामपंचायतींपैकी जी ग्रामपंचायत सर्वाधिक स्वच्छ असेल त्या गावात मी स्वतः येऊन पाच लाखांचा निधी देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी
कारसेवकांच्या आनंदात सहभागी व्हा
राज ठाकरे पुढे म्हणाले, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या दिवशी राम मंदिर होत आहे तेव्हा बाकीच्या भानगडीत पडू नका. मी इतकेच सांगेन की कारसेवकांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आता पूर्ण होत आहे. मनसैनिकांनी कारसेवकांच्या आनंदात सहभागी व्हावे. जिथे शक्य होईल तेथे आरत्या किंवा अन्य कार्यक्रम दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.