“राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..” राज ठाकरेंच्या रडारवर कोण?

“राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..” राज ठाकरेंच्या रडारवर कोण?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. तसेच स्वपक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांनाही इशारा दिला. मी आज काही फार बोलणार नाही. वीस दिवसांवर गुढीपाडवा मेळावा आला आहे. मी तिकडे दांडपट्टा चालवणारच आहे तर मग चाकू आणि सुरे कशाला काढू? राजकारणाचा चिखल झाला आहे. मतं मिळवण्यासाठी डोकी फोडून घेत आहेत. आगी लावत आहेत पण हे आमच्या लोकांना काही समजत नाही अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच कामचुकारपणा केलात तर पदावर ठेवणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज ठाकरे म्हणाले, मला जे काही बोलायचं आहे ते मी गुढीपाडव्याला बोलणारच आहे. पण जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडाकवण्याचे उद्योग सध्या जाणूनबुजून सुरू आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. एकमेकांची डोकी फोडत आहेत. हे लोकांना समजत नाही. सध्याचं राजकारण पाहिलं असता त्याला हंटरने फोडला असता. विषय भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घडवल्या जात आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

भय्याजी जोशींनी असलं विधान बेंगळुरूमध्ये करून दाखवावं.. संतापलेल्या राज ठाकरेंचं आव्हान

अनेक राजकीय पक्षांना प्रश्न पडलाय की यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आताचे जे राजकीय फेरीवाले आहेत ना तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण दुकान बांधू पण फेरीवाले मात्र होणार नाही असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला.

मी पाणी पिणार नाही, राज ठाकरे का म्हणाले

मुंबईत त्या दिवशी बैठक घेतली. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर नव्हते. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभाला गेलो होतो असे सांगितले. त्यांना म्हटले गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर अंघोळ केली का असे देखील विचारले. आता बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणलं ते मी पिणार नाही हे स्पष्ट सांगितलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. तिथे आलेले माणसे अंग खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेचं पाणी घ्या. कोण पिणार ते पाणी अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली.

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?, संजय राऊतांनी सांगितली आतली बातमी

..तर मी त्याला  पदावर ठेवणार नाही

आपली पक्षसंघटना सर्व ठिकाणी आहे. पण ही संघटना मजबूत करण्याची गरज आहे. गटअध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. माझ्यासकट प्रत्येकाचाच काय काम असणार हे दर 15 दिवसाला तपासले जाईल. जर महिना दीड महिन्यात जाणवलं की हा पदाधिकारी मग तो कुणी का असेना मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube